महागाई, दर वाढीचा पालिकेला फटका; अळीनाशक तेलाच्या खरेदीसाठी ३ कोटी अधिकचा खर्च

    मुंबई (Mumbai) : वाढती महागाई, विविध प्रकारचे तेल, गॅसचे वाढते दर यामुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. मात्र या महागाईचा फटका सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही बसत आहे. मुंबईत पावसाळी आजार रोखण्यासाठी मच्छर, डास आणि त्याच्या अळ्या नष्ट केल्या जातात. पालिकेकडून धूर फवारणी तसेच साचलेल्या पाण्यात अळीनाशक तेल टाकले जाते. वाढत्या महागाईमुळे पालिकेला मागील खरेदीपेक्षा ३ कोटी ११ लाख अधिक देऊन पुढील तीन वर्षासाठी हे तेल खरेदी करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

    मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुणीया, हत्तीरोग यासारखे साथीचे आजार पसरतात. या आजारांना रोखण्यासाठी पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून मुंबईत मच्छर, डास आणि त्यांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी धूर फवारणी करण्यासाठी गटारे आणि साचलेल्या इतर पाण्यात तेल टाकून मच्छरांची उत्पत्ती रोखली जाते. यासाठी पालिका दरवर्षी ११ लाख लिटर अळीनाशक तेल भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीकडून खरेदी करावे लागते. दर ३ वर्षांनी या अळीनाशक तेलाची खरेदी करण्यासाठी कंत्राटदारावर कोट्यवधीचा खर्च करावा लागतो.

    २०१९ – २२ या ३ वर्षांसाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने दरवर्षी ११ लाख याप्रमाणे ३३ लाख लिटर अळीनाशक तेल खरेदी केले होते. यासाठी पालिकेने मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीला २७ कोटी २५ लाख रुपये अदा केले होते. या कंत्राटकामाची मुदत ३१ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे पालिकेने नव्याने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ ते २०२५ या ३ वर्षांसाठी प्रतिलिटर ९२.०४ रुपये या दराने एका वर्षासाठी ११ लाख याप्रमाणे ३ वर्षासाठी ३३ लाख लिटर अळीनाशक तेल खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिका ३० कोटी ३७ लाख रुपये खर्च करणार आहे.

    ३ कोटी ११ लाख रुपये जादा खर्च
    पालिकेने २०१९ – २२ या ३ वर्षासाठी प्रति लिटर ८२.६० रुपये या दराने ३३ लाख लिटर तेल खरेदी करण्यात आले. त्यासाठी पालिकेने २७ कोटी २५ लाख रुपये खर्च केले होते. २०२२ ते २०२५ या ३ वर्षासाठी प्रति लिटर ९२.०४ रुपये या दराने ३३ लाख लिटर तेल खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेला ३० कोटी ३७ लाख रुपये एवढी रक्कम अदा करावी लागणार आहे. पालिकेला मागील खरेदीपेक्षा प्रति लिटर मागे ९.४४ रुपये अधिक द्यावे लागणार असल्याने पालिकेला ३ कोटी ११ लाख रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे.