मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचे पाऊल टाकले आहे. देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करत आहे. यामुळे जवळपास ४० लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.
मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
तसेच या कराराच्या माध्यमातून ३ हजार ९०० पेक्षा अधिक कोर्सेसचे मोफत प्रशिक्षणही राज्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ते बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचे पाऊल टाकले आहे. देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करत आहे. यामुळे जवळपास ४० लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.
इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे ३ हजार ९०० पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस असणार असल्याचे त्यांनी सांगितले.