माजी मंत्री घोलप यांच्यावर शाईफेक; सोलापूरातील घटना

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात शाईफेकीचा (Ink Attack on Babanrao Gholap) प्रकार घडला आहे. या सोलापुरातील कार्यक्रमात भानुदास शिंदेच्या कुटुंबियांकडून घोलप यांचा निषेध केला आहे.

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात शाईफेकीचा (Ink Attack on Babanrao Gholap) प्रकार घडला आहे. या सोलापुरातील कार्यक्रमात भानुदास शिंदेच्या कुटुंबियांकडून घोलप यांचा निषेध केला आहे. अशोक लांबतुरे या दोषींवर कारवाई न केल्यास बबनराव घोलपाचे कपडे फाडू, असा इशारा दिला आहे.

  मयत भानुदास शिंदे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे अशोक आणि सुरेखा लांबतुरे यांना पाठिशी घालणाऱ्या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर शाईफेक करुन शिंदे कुटुंबीय घोषणाबाजी केली. चार वर्षांपूर्वी मयत भानुदास शिंदे यांनी अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरेंसह अनेक जणांचे नावे लिहून शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती. यामुळेच शिंदे कुटुंबीयांनी लांबतुरेंवर कारवाई करुन महासंघातून काढून टाकण्याची मागणी बबनराव घोलप यांच्याकडे केली होती. रविवारी चर्मकार महासंघाचा सोलापुरात कार्यक्रम आयोजित केला होता. यात बबनराव घोलपांची उपस्थिती होती. यावेळी ही घटना घडली.

  मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेमधील संचालक अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार चर्मकार समाजातील प्रमुख तथा आश्रम शाळेमधील संचालक मयत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता. त्याचा राग मनात धरून अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती.

  या घटनेनंतर चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे कुटुंबीयांना विश्वासात घेत न्याय देतो, अशी ग्वाही देऊन अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी यांना संघटनेतून काढून टाकले होते. जोपर्यंत शिंदे कुटुंबियांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांना संघटनेत घेणार नाही, असा शब्द दिला होता.

  तो दिलेला शब्द खोटा ठरवत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबाला फसवून त्यांना संघटनेत पुन्हा घेऊन सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आले होते. त्यामुळे माजी मंत्री बबनराव घोलप यांना मयत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला तर त्यांचे चिरंजीव धनू शिंदे यांनी स्टेजवर त्यांच्यावर शाईफेक केली. तसेच त्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आहेत.

  यावेळी स्टेजवर आमदार प्रणिती शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव आणि समाजातील प्रतिष्ठित व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे कुटुंबीय आपल्या वडिलांच्या मारेकर्‍यांना तुम्ही पाठीशी का घालत आहात ? असे म्हणत आपला रोष सभागृहांमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सर्व समाजासमोर व्यक्त केला.