अंगणवाडी मुलांच्या जेवणात आढळल्या आळ्या

जामखेड शहरातील कुपोषित लहान मुलांना अंगणवाडीतून देण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा (Bad Quality Food) असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि.२४) खंडोबानगर भागातील अंगणवाडीतून सकाळी दिलेल्या आहारात आळ्या आढळून आल्या आहेत.

    जामखेड : जामखेड शहरातील कुपोषित लहान मुलांना अंगणवाडीतून देण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा (Bad Quality Food) असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि.२४) खंडोबानगर भागातील अंगणवाडीतून सकाळी दिलेल्या आहारात आळ्या आढळून आल्या आहेत. कुपोषित मुलांना दिला जाणारा हा कसला पोषण आहार? हा तर कुपोषण आहार! अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

    कुपोषित मुलांना जेवणात दाळ, भात, चपाती, आलु तसेच नाष्ट्याला चने, चवळी, मुग अशाप्रकारे कुपोषित मुलांना डब्यातून आहार दिला जातो. सदर आहाराचे डबे पालक अंगणवाडीतून घेऊन जातात. एका कुपोषित मुलांच्या पालकाने रोजच्याप्रमाणे घरी मुलांला आहार देण्यासाठी डबा उघडला असता पातळ डाळीमध्ये आळ्या दिसून आल्या. डाळ खाली-वर करून ताटात ओतली असता आणखी आळ्या दिसल्या. त्या पालकाने आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक संतोष नवलाखा यांना फोन केला.

    नवलाखा यांनी घरी जाऊन पाहिले तसाच डबा घेऊन महिला व बालकल्याण आधिकारी यांच्या कार्यालयात गेले. मात्र, सदर महिला आधिकारी सुट्टीवर असल्याचे समजले. त्यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. हे लोकवर्गणीतून चालत असलेल्या आरोळे यांच्या संस्थेमार्फत कुपोषित मुलांना डब्बे दिले जातात. त्यांच्याशी मी बोलते असे महिला अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी पालकांकडे चौकशी केली असता असा प्रकार यापूर्वीही घडला आहे. मात्र, हे लोक गरिब आहेत त्यांची मुलं कुपोषित आहेत. ते काही बोलले तर त्यांना हा आहार मिळणार नाही. या भीतीने कोणीही काहीही सांगत नाहीत.