इस्लामपूर नगरपालिका सभा गणपूर्तीअभावी रद्द

हराचे ईश्वरपूर नामकरण करण्याबरोबरच अन्य तीस विषयांच्या मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली आजची (ता.२७) सर्वसाधारण सभा ही गणपूर्तीअभावी रद्द करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. शिवाय धक्कादायकरित्या विकास आघाडीच्याही तीन नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली.

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहराचे ईश्वरपूर नामकरण करण्याबरोबरच अन्य तीस विषयांच्या मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली आजची (ता.२७) सर्वसाधारण सभा ही गणपूर्तीअभावी रद्द करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. शिवाय धक्कादायकरित्या विकास आघाडीच्याही तीन नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली.

    ईश्वरपूर नामकरणासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचे नेते आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली. तर वैभव पवार यांनी राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष तैलचित्र अनावरणला राष्ट्रवादीचेच नगरसेवक गैरहजर असल्याची भावना व्यक्त केली.

    नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वरपूर नामकरण विषयावर चर्चा होणार असल्याने या सभेला राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता होती. संपूर्ण शहराचे त्याकडे लक्ष लागले होते; मात्र, शिवसेनेचे चार व नगराध्यक्षांसह विकास आघाडीचे ४ असे एकूण आठ जणच या सभेला उपस्थित होते. गणपूर्तीसाठी ९ नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक असल्याने त्या पूर्तीअभावी आजची सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली.

    आनंदराव पवार यांनी गैरहजर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कळकळीची विनंती केली. ईश्वरपूर नामकरण करणे हा माझा एकट्याचा विषय नाही. माझा कोणत्याही जातीधर्माला विरोध नाही. ईश्वर सर्वांचा असतो. अल्ला हा देखील ईश्वर आहे. त्या नात्याने आम्ही ईश्वरपूरसाठी आग्रही आहोत. अल्ला हा देखील ईश्वर आहे. त्या नात्याने आम्ही ईश्वरपूरसाठी आग्रही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वाळव्यासह २३ गावांना येऊन गेल्याचा ३६१ वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्यावेळच्या नोंदींमध्ये उरण असाच उल्लेख आहे. ज्या परकी हल्लेखोरांनी येथे तळ ठोकला त्यांनी इस्लामपूर असे नाव दिल्याचे संदर्भ आहेत, असे असताना नाव बदलण्यासाठी विरोध कशासाठी? राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात उपस्थित राहून आपली विरोधाची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन पवार यांनी केले.

    विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी खंत व्यक्त करीत ज्या विजयभाऊ यांनी शहरावर ३१ वर्षे राज्य केले. त्यांच्या तैलचित्र अनावरणाला राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुपस्थित राहावे, हे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली. विकास आघाडी मंगल शिंगण, अन्नपूर्णा फल्ले यांच्यासह शिवसेनेच्या सीमा पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार सभेला उपस्थित होते.