जिल्ह्याला कोड्यात टाकून जयंत पाटील कलावंतीणीच्या कोड्यात !

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Sangli District Central Co-operative Bank) संपूर्ण जिल्ह्याला कोड्यात टाकून पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) थेट मणेराजुरीच्या इतिहासकालीन कलावंतीणीच्या कोड्यात रमल्याचा अनुभव तासगाव तालुक्याने घेतला

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Sangli District Central Co-operative Bank) संपूर्ण जिल्ह्याला कोड्यात टाकून पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) थेट मणेराजुरीच्या इतिहासकालीन कलावंतीणीच्या कोड्यात रमल्याचा अनुभव तासगाव तालुक्याने घेतला. ‘करेक्ट कार्यक्रमा’साठी प्रसिद्ध मंत्र्यांनाही कोड्यात टाकणाऱ्या या कोड्यात सर्वत्र चर्चा आहे.

    जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी प्रथमच सांगली जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवत आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे भाजप खासदार संजय पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतल्याने भाजपला पॅनेलची एक बाजू कमकुवत झाली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेत कोणाकोणाला वर्णी लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

    जिल्ह्यात विरोधांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी जयंत पाटील यांची खासियत आहे. त्यामुळे नेमके कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पॅनेलचा उमेदवार विजयी होणार याची उत्सुकता आहे. विरोधी पॅनेलमध्येही जयंतरावांशी जुळवून घेणारे अनेक असल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे. कोण कोणाला शब्द दिला याची खुमासदार चर्चा आहे.

    असे असताना एक अनपेक्षित कृती जयंतरावांनी केली. मतदानाच्या पूर्वसंध्येला कलावंतीणीचे कोडे नावाने प्रसिद्ध ठिकाणी मंत्री पाटील यांनी भेट देऊन ते कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपले सहकारी कोड्यात उतरवले. मात्र, कोडे काही सुटले नाही. तासगाव तालुक्याबाबत आधीच राजकीय कोड्याची उत्सुकता असताना जयंतरावांनी हे कोडे सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची खुमासदार चर्चा सुरु झाली आहे.

    निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या जत-कवठेमहांकाळ या तालुक्यात भेटीगाठी संपवून तासगावकडे येताना त्यांच्या गाड्यांचा ताफा मणेराजुरीच्या कोडयाच्या माळावर थांबला. हे कोडे पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती त्यांना ग्रामस्थांनी दिली. दगडांची गोलाकार रचना आणि त्यातून बाहेर पडणे मुश्किल असल्याचे समजल्याने जयंतरावांनी प्रयत्न केला. पण ते सुटले नाही. जिल्हा बॅंकेचे जयंतरावांनी टाकलेले कोडेही अनेकांना सुटले नसल्याने सोमवारी निकाल जाहीर होईपर्यंत तरी उत्सुकता कायम असणार आहे.