तरुणाचे अपहरण करून वडिलांना मागितली लाखोंची खंडणी; पोलिसांनी दोघांना केली अटक

    औरंगाबाद : घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून एका 35 वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून त्याच्या वडीलांना १० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपीला औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे.

    दरम्यान आरोपीच्या ताब्यात असलेल्या पीडित मुलाची सुखरुप सुटकाही केली. शामराव सीताराम पवार, शेख फय्याजोद्दीन सेख मेहराजोद्दीन अशी आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात राहणाऱ्या मधुकर लहानू अवचरमल यांनी २१ मार्च रोजी पहाटे पोलिसांत तक्रार दिली होती.

    दोन आरोपींना अटक

    त्यात तुमच्या मुलाला आम्ही जालना येथे घेऊन आलो आहोत, तुमचा मुलगा तुम्हाला परत हवा असेल तर सकाळी जालन्यात १० लाख रुपये घेऊन याल अशी खंडणीची धमकीचे फोन आल्याचे म्हटले होते. त्यावरुन एक पथक जालन्याला पाठवून अपहरण झालेला मुलगा किशोर अवचरमल याची आरोपीच्या तावडीतून सुखरुप सुटका करत दोन आरोपींना अटक केली.

    दरम्यान अपहरण झालेल्या किशोर याने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आरोपींनी पैसे वसुल करण्यासाठी अपहरण करण्याची शक्कल लढविल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.