
संतोष परब यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिंधुदुर्ग : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी तीक्ष्ण चाकूने त्यांच्यावर वार केले होते.
दरम्यान याप्रकरणी भाजपा नेते नितेश राणे यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्व असलेल्या भाजप नेत्यांकडे पोलिसांनी आता मोर्चा वळवला आहे. या चाकू हल्ल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचे पती गोट्या सावंत, नितेश राणे यांच्यासह अनेकांची सिंधुदुर्ग पोलिसांनी चौकशी केली आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होण्याची आशा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते मला नाहक शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.