जाणून घ्या पुरुषांमधील थायरॉईडची लक्षणे; कोणत्याही वयोगटात होऊ शकतो थॉयराईडचा त्रास

हायपरथायरॉईड या आजारात चयापचयात वेगाने आणि अनियमित बदल होतात त्यामुळे व्यक्तीला झोप लागत नाही, व्यक्ती चिडचिडी होते, बैचेनी येणे इ. समस्या येतात. त्याचबरोबर सतत नकारात्मक विचार, चिंता तसेच एकाग्रता कमी होणे आदी दुष्परिणाम दिसून येतात.

  थायरॉईड म्हटले की स्त्रियांचा आजार असे मानले जाते पण असे नाहीये. पुरुषांमध्येही थायरॉईड अनेक आजारांमधील एक महत्त्वाचे कारण असू शकते. पुरुषांमध्ये अति सक्रिय थायरॉईड ग्रंथीमुळे हायपरथायरॉईड होतो तसेच सक्रिय नसलेल्या थायरॉईडमुळे हायपोथायरॉईड होतो. थायरॉईड ग्रंथी शरीराची चयापचय क्रियेला नियंत्रित करते. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीची समस्या असल्यास चयापचयाचा वेग कमी किंवा अधिक असू शकतो. यामुळे थायरॉईडची विविध लक्षणे दिसू लागतात.

  प्रतिकारशक्तीचे कार्य योग्य प्रकारे न झाल्यास थायरॉईडची संप्रेरके वेगाने घटतात किंवा वाढतात त्यामुळे व्यक्तीच्या जीवनशैलीवर त्याचा प्रभाव पडू लागतो. यामागे अनुवांशिक, प्राकृतिक आणि आहार ही देखील कारणे असू शकतात. ज्या महिलांना हार्मोनल असंतुलनाचा त्रास होतो त्या आजाराविषयी अधिक संवेदनशील असतात. थायरॉईडची समस्या वीस ते चाळीस वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आढळून येते, मात्र कोणत्याही वयोगटात थॉयराईडचा त्रास होऊ शकतो. पुरुषांमध्येही थायरॉईडच्या असंतुलनाची काही लक्षणे दिसतात.

  शरीर ऊर्जेत अनियमित बदल
  हायपरथायरॉईड या आजारात चयापचयात वेगाने आणि अनियमित बदल होतात त्यामुळे व्यक्तीला झोप लागत नाही, व्यक्ती चिडचिडी होते, बैचेनी येणे इ. समस्या येतात. त्याचबरोबर सतत नकारात्मक विचार, चिंता तसेच एकाग्रता कमी होणे आदी दुष्परिणाम दिसून येतात. वेगवान शारीरिक हालचाली करण्यासाठी शरीरात पुरेशी शक्तीही टिकून राहत नाही.

  वजन आणि आहारातील बदल
  हायपरथायरॉईड आजारात चयापचय क्रिया वेगाने होते. त्यामुळे थायरॉईडग्रस्त पुरुषांची भूक वाढते आणि ते सर्वसामान्य आहारापेक्षा अधिक आहार घेतात. मात्र, जरूरीपेक्षा अधिक आहार घेऊनही वजन घटते. अशा परिस्थितीत अधिक वेळा शौचास जावे लागते किंवा सतत जुलाब होतात. दुसरीकडे हायपरथायरॉईडमुळे चयापचयाचा वेग मंदावल्यामुळे या पुरुषांना भूक कमी लागते त्यामुळे जेवणही कमी जाते. तरीही वजन वाढत राहते. तसेच बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांची क्षमता ही कमी होते. हायपरथायरॉईडने ग्रस्त पुरुषांमध्ये काही वेळा स्तनांची असामान्य वाढ झाल्याचे आणि चयापचयाचा वेग वाढल्याचे दिसून येते. मात्र हे लक्षण अभावानेच पाहायला मिळते.

  स्नायू दुखणे आणि अशक्तपणा
  हायपरथायरॉईड झाल्यास स्नायू कमजोर होतात आणि शरीर खूप अशक्त होते. बर्‍याचदा कंबर, खांदे आणि गुडघे दुखतात तसेच सांध्यांना सूजही येते. त्याशिवाय वस्तू दोन दोन दिसणे, डोळ्यांची आग होणे तसेच हृदयाचे ठोके वाढणे अशीही लक्षणे दिसतात. थायरॉईडमध्ये डोळ्यांच्या मागे सूज येते, आवाज घोगरा होतो आणि चेहऱ्यावर सूज येण्यासारखी लक्षणे दिसतात.