
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं गुरुवारी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं गुरुवारी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं पार्थिव आज दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.
राजकीय तसंच सामाजिक कार्यातून त्यांनी अनेकांच्या मनावर ठसा उमटवला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने केल्हापूर जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशीही फुटबॉललच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता.
दरम्यान गेल्या दीड वर्षात दोन वेळा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून ते बरे झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच आज हैदराबादेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली
कोल्हापूर (उत्तर) मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत चंद्रकांत जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली…”