तब्बल 35 वर्षांपासून महानिर्मितीकडे असलेलं कोयना धरण विकण्याच्या तयारीत

  रत्नागिरी : कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे. त्यामुळे या धरणातून अनेक जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. पण रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या या कोयना धरणाची आता खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झालीय का, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण महानिर्मितीकडे 35 वर्षांपूर्वी हस्तांतरीत प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केला जाणार आहे.

  दरम्यान त्यानुसार कोयना तिसरा टप्पा आणि कोयना पायथा टप्पा पुन्हा जलसंपदा विभागाकडे जाणार आहे. बीओटी तत्त्वानुसार याची देखभाल दुरुस्ती होणार आहे. 35 वर्ष पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि त्यानंतर परिचालन करण्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. या साऱ्या प्रक्रियेमुळे या प्रकल्पाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळतायत. राज्यातील आणखी चार जलविद्युत प्रकल्पदेखील जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केले जातायत.

  कोयना धरण कधी बांधलं?

  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या कोयना धरणाची निर्मिती 1963 मध्ये झाली. हे धरण सातारा शहरापासून 98 किमी अंतरावर आहे, तर पाटण शहरापासून 20 किमीवर आहे. या धरणाची क्षमता 98.78 टीएमसी असून, जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 1920 मेगावॉट इतकी आहे. कोयना नदीवर बांधलेले हे काँक्रिट धरण आहे, चिपळूण आणि कराडदरम्यान राज्य महामार्गावर निर्मिलेलं हे धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नगर परिसरात येते.

  भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प

  कोयना धरणातून प्रतिदिनी सरासरी केवळ 0.19 अब्जघनफूट प्रतिदिन एवढं पाणी पूर्ण वर्षभर पश्चिमेकडे वळवून वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीमुळे प्रतिदिनी वाशिष्ठी नदीत जाणारा विसर्ग तीन हजार घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक्स) ते जास्तीत जास्त आठ हजार क्युसेक्स इतकाच असतो. कोयना जलविद्युत प्रकल्प हा टिहरी धरण प्रकल्पानंतर भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना धरणाची निर्मिती महाराष्ट्र सरकारनं केली असून, गंगा, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रानंतर कोयना नदी ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. तेलंगणा राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ती कर्नाटक राज्यातून वाहते.