अवकाळी पावसाने पसरणी घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात

संततधार पडणारा पाऊस, धुके यामुळे वाहनचालकांची वाहन चालवताना कसरत होत आहे. दत्तमंदिराच्या नजीक पडलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

    वाई : वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली असून, बांधकाम विभागाच्या वतीने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

    अवकाळी पावसामुळे वाई-महाबळेश्वर रस्त्यावर दत्तमंदिरनजीक मोठी दरड पसरणी घाटामध्ये कोसळली आहे. त्यातच धुक्याचे साम्राज्य संपूर्ण घाटात पसरल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

    संततधार पडणारा पाऊस, धुके यामुळे वाहनचालकांची वाहन चालवताना कसरत होत आहे. दत्तमंदिराच्या नजीक पडलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

    याची माहिती बांधकाम विभागास मिळताच तातडीने बांधकाम विभागाचे श्रीपाद जाधव आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यातील मोठमोठे दगड हलवण्याचे काम युध्दपातळीवर करुन वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत केली आहे. सायंकाळपर्यंत रस्त्यातील मोठमोठ्या दगडी हलविण्याचे काम सुरू होते. तर एका बाजूने वाहतूकही सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली होती.

    संततधार पावसामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी आपले वाहने कोठेही उभी करू नयेत, असे आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.