कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा; यशोमती ठाकूर यांचा मोदींना टोला

देशात काँग्रेस नेत्यांनी कोरोना पसरवला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आता यावरच कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोदींना सडकून टोला लगावला आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. देशात काँग्रेस नेत्यांनी कोरोना पसरवला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आता यावरच कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोदींना सडकून टोला लगावला आहे.

    यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या? 

    “काँग्रेसला दूषणे देण्याशिवाय नरेंद्र मोदी यांच्याकडे आता काही काम राहिलेले नाही. स्वतःच्या कामांची एक ही उपलब्धी त्यांना सांगता येत नाही. चीन- पाकिस्तान च्या वाढत्या कारवाया, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. पण त्यांनी सर्व महत्वाच्या प्रश्नांवर मौन धारण केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, कॉंग्रेस मुक्त भाषण तर करून दाखवा आधी”, असे आव्हानही यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.

    दरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनाला महाराष्ट्र शासनाला आणि कॉंग्रेसला जबादार धरल्याने राज्यातून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आज याविरोधातच नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर कॉंग्रेसने आंदोलन छेडले आहे. कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनही याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजप आमने-सामने आले आहेत.