विधान परिषद निवडणूक: मंगेश देशमुख (काँग्रेस) विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा)
विधान परिषद निवडणूक: मंगेश देशमुख (काँग्रेस) विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा)

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे डॉ. रवींद्र भोयर यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र, निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच काँग्रेसने उमेदवार बदलला आहे.

    नागपूर (Nagpur) : राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी अवघे काही दिवस तास शिल्लक राहिले आहे. नागपुरात मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने एनवेळी आपला उमेदवार बदलला आहे. आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तस पत्रक काँग्रेसने देखील काढलं आहे. काँग्रेसने अचानक उमेदवार बदलल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

    विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख हे बुधवारी काँग्रेस कँपमध्ये वावरल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेस देशमुखांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, तेव्हा काँग्रेसचे छोटू भोयर यांनी हा दावा फेटाळला होता. मात्र, आता पक्षानं अधिकृत पत्रक काढत मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

    नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी, असं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे.

    दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून मोठा प्लान तयार करण्यात आला होता. त्यासाठी स्थानिक नेत्यांनी मुंबई व दिल्लीत संपर्क साधला. या निवडणुकीत भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री डॉ. नितीन राऊत व सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसंच, निवडणुकीच्या नामांकनानंतर मतदारांशी संपर्कासाठी वातावरण तापण्यापूर्वीच भाजपने त्यांच्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवले होते. सुमारे ३०० सदस्यांचे जत्थे भाजपशासित राज्याच्या राजकीय पर्यटनाचा आनंद लुटून बुधवारी परतल्यानंतर सर्वांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले. आरटीपीसीआर चाचणी करून आलेले सदस्य थेट मतदानासाठी बाहेर पडून आपापल्या घरी जातील.