आश्रमशाळेतील सहा वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; मुलाचा जागीच मृत्यू

मुलाला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. आश्रमशाळा आणि स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. अखेर मुलाचा मृतदेह शोधण्यात आला आहे.

    नाशिक : नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा हल्ल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. अशातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात असणाऱ्या आश्रमशाळेतील सहा वर्षीय मुलाचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

    नाशिक जिल्ह्यात निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र आता बिबट्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आपला मोर्चा वळविल्याचे या घटनेवरून दिसून येते. जुलै महिन्यातच तालुक्यातील धुमोडी परिसरात आठ वर्षीय मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याच परिसरातील वेळुंजे गावानजीक असलेल्या आश्रमशाळेजवळ बिबट हल्ल्याची घटना घडली आहे.

    आर्यश निवृत्ती दिवटे असे या बालकाचे नाव आहे. वेळुंजे गावानजीक आश्रमशाळेत तो शिकत होत.सायंकाळच्या सुमारास मुलगा शाळेच्या आवारात असताना तसेच परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने सहा वर्षीय मुलावर झडप घातली. त्याला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. आश्रमशाळा आणि स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान दोन तासांपासून वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी शोध कार्य सुरू होते. अखेर मुलाचा मृतदेह शोधण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण वेळुंजेसह धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.