Leopard Attack
संग्रहित फोटो

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा उपद्रव चालूच आहे. सोमवारी रात्री चांदेकसारे एडंकी परिसरात परशराम होन यांच्या गाईच्या गोठ्यावर द्वारका डेअरी फार्मवर बिबट्याने हल्ला केला. मात्र, होन यांच्या कुत्र्याने गाई व कालवडींचे बिबट्यापासून संरक्षण केले.

  कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा उपद्रव (Leopard Attacked) चालूच आहे. सोमवारी रात्री चांदेकसारे एडंकी परिसरात परशराम होन यांच्या गाईच्या गोठ्यावर द्वारका डेअरी फार्मवर बिबट्याने हल्ला केला. मात्र, होन यांच्या कुत्र्याने गाई व कालवडींचे बिबट्यापासून संरक्षण केले. मग बिबट्याने कुत्र्याकडे मोर्चा वळवित कुत्र्याला ठार करत त्याची शिकार केली.

  द्वारका डेअरी फार्म परिसरातील शेतकरी व नागरिक या बिबट्याच्या दहशतीने पुरते भयभीत झाले असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. परशराम होन यांचा द्वारका डेअरी फार्म नावाने लडकी शिवारात गाईचा गोठा आहे. मोकळा गोठा असल्याने परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचे लक्ष या गोट्यावर गेले. गोठ्यामध्ये कालवडींची संख्या जास्त आहे‌ कालवडीची शिकार करून बिबट्या आपली रात्र काढणार होता.

  जिवाच्या आकांताने हंबरडा

  शिकारीच्या उद्देशानेच बिबट्याने सोमवारी रात्री गोट्यावर हल्ला चढवला. मात्र गेल्या अनेक वर्षापासून होन याच्या गोठ्यावर असलेले पाळीव कुत्र्यांने बिबट्याचा सामना केला. गोठ्यामध्ये बिबट्याला प्रवेश करू दिला नाही. चवताळलेल्या बिबट्याने मग मात्र कुत्र्यालाच ठार करत त्याची शिकार केली. गाईच्या गोठ्यातील गाय व कालवडींनी जिवाच्या आकांताने हंबरडा फोडला. गाईच्या ओरडण्याचा आवाज गोट्याच्याच बाजूला झोपलेले डॉ. सनी होन यांनी ऐकला लगेच उठले. बिबट्यांच्या पायांचे ठसे त्या ठिकाणी दिसून आले. बिबट्याने कुत्र्याला उसाच्या शेतात ओढत नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी द्वारका डेअरी फार्मचे व्यवस्थापक किरण होन व वडील परशराम होन यांना जागे करत त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

  अनेक दिवसांपासून वावर

  गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे किरण होन यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ चांदेकसारे ग्रामपंचायतीशी संपर्क साधत ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर यांना यासंदर्भात माहिती दिली. या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, असे त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी आपल्या शेतामध्ये देखील शेतातील कामे करण्यासाठी शेतकरी बिबट्याच्या दहशतीने धजावत नाही.

  गेल्या आठवड्यात शिवाजी गव्हाणे, झगडे व बाळासाहेब खरे यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला करत कालवड, कुत्री व बोकडांची शिकार केल्याची घटना ताजी असतानाच द्वारका डेअरी फार्म बिबट्याने हल्ला केला. घटना गंभीर असल्याने वन विभागाने तत्काळ याची दखल घेऊन या परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी द्वारका डेअरीचे व्यवस्थापन किरण होन यांनी केली आहे.