येवल्यातील बदापूरमध्ये बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

    नाशिक : येवला तालुक्यातील बदापुर शिवारात गेल्या काही दिवसांपासून दर्शन देणारा बिबट्या अखेरीस रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

    बदापुर येथील महिपत देवराम मोरे यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. परंतु, बिबट्या हुलकावणी देत होता. अखेरीस रात्री 8 वाजेच्या सुमारास हा 2 वर्षाचा नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्वरित वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.