Maha distribution staff's battle to change the Rohitra on Raireshwar Plateau, the campaign was successful in three days

  बारामती : वरवरच्या कामाला शेकडो ठेकेदार सहज मिळतात. परंतु दुर्गम भागात काम करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम महावितरणलाच करावे लागते आणि महावितरणच ते करु शकते. रायरेश्वर पठारावरील नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या मोहिमेतून ते अधोरेखित झाले आहे.

  पाण्याची बाटली सुद्धा अशावेळी जड

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली. त्या रायरेश्वरावर २०१९ मध्ये जिल्हा विकास निधीतून महावितरणने वीज नेली. रायरेश्वर किल्ला केवळ चढून जाणे सुद्धा सोपे काम नाही. हातातील पाण्याची बाटली सुद्धा अशावेळी जड वाटते. त्या किल्ल्यावर २०१९ साली महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी रोहित्र आणि खांब अंगाखांद्यावर नेऊन विद्युतीकरणाचे काम केले होते. त्यापैकी एक रोहित्र शनिवारी (दि. ३ फेब्रु.) नादुरुस्त झाले.

  नवीन रोहित्र बदलणे म्हणजे एक मोठे आव्हानच

  रायरेश्वर किल्ला भोर तालुक्यात असून, महावितरणच्या निगुडघर वीज उपकेंद्रातून किल्ल्यावर व परिसरातील वस्त्यांना वीजपुरवठा केला जातो. हिर्डोशी शाखेचे कर्मचारी त्यासाठी सदैव तत्पर असतात. रायरेश्वरच्या किल्ल्यापासून पुढे वरची धानवली व वाघमारे वस्ती आहे. वस्तीला वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र २०१९ मध्ये उभारले होते. त्यावर ३० वीज जोडण्या असून, शनिवारी (दि.३ फेब्रु.) हे रोहित्र नादुरुस्त झाले. जागेवर रोहित्र दुरुस्त करणेसाठी शाखा अभियंता सागर पवार यांनी खूप प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. त्यात नवीन रोहित्र बदलणे म्हणजे एक मोठे आव्हानच होते.

  ६ किलोमीटरचे डोंगरदऱ्यातील अंतर पार

  एका ठेकेदाराने त्याचे ८-१० बिहारी मजूर पाठवले. हिर्डोशी शाखेचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ त्यांना मदत करण्यास पुढे आले. परंतु, समोरचा सह्याद्री पाहून बिहारी मजुरांनी माघार घेत पळ काढला. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. स्थानिकांनी त्यांना मोलाची मदत केली. साधारणत: ६ किलोमीटरचे डोंगरदऱ्यातील अंतर पार करायचे होते. त्यासाठी त्यांनी तीन टप्पे पाडले.

  कड्यापासून पाच किलोमीटरचा टप्पा

  बुधवारी (दि.७) सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. पहिला टप्पा शिडीचा होता. अरुंद व खडी पायवाट. त्यात किमान ७०० किलो वजनाचे रोहित्र. नवगणची (लाकडापासून बनवलेले जुगाड) मदत घेत मोठ्या हिंमतीने एक-एक पायरी चढायला सुरुवात केली आणि दिवसभरात पहिला टप्पा गाठला. दुसऱ्या दिवशी कड्यापासून पाच किलोमीटरचा टप्पा सायंकाळी पूर्ण झाला. अंधार झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी तिसरा टप्पा सुरु केला. अंतर थोडेच उरले असले तरी जुने रोहित्र उतरुन दुसरे चढवायचे व तांत्रिक बाबी पूर्ण करुन ते चालू करणे ही कामे होती. ‘हर… हर… महादेव’ व छत्रपती शिवरायांचा जयघोष करत; सर्व आव्हानांना तोंड देत शुक्रवारी ( दि. ९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नवीन रोहित्र सुरु करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

  ठेकेदाराला रोहित्र वर नेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी

  दोन वर्षापूर्वी हेच रोहित्र पहिल्यांदा नादुरुस्त झाले होते. त्यावेळी ठेकेदाराला रोहित्र वर नेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागला होता. त्या तुलनेत यावेळी हे काम फक्त तीन दिवसांत पूर्ण केल्याचा आनंद वीज कर्मचाऱ्यांना होता.
  या टीम मध्ये …

  महावितरणतचे शाखा अभियंता सागर पवार यांचेसह यंत्रचालक दिपक शिवतरे जनमित्र राजू वणवे, रणजित बाबर व भगवान ठाकूर, निम्नस्तर लिपिक अक्षय शिवतरे, बाह्यस्रोत कर्मचारी गुणाजी तुपे, संतोष जेधे, श्रीकांत पारठे, अजय पारठे, निवृत्ती कंक, आखाडे एजन्सीचे विजय नवले व संजय पाटील यांचा या मोहिमेत सहभाग होता. तर धानवली व वाघमारे वस्तीवरील सुरेश वाघमारे, लक्ष्मण धानवले, श्रीराम धानवले, नथु धानवले, गणेश धानवले, रामभाऊ डोईफोडे, नामदेव वाघमारे, गणेश वाघमारे, अनिल धानवले, अजित धानवले, मुकुंद धानवले व संतोष धानवले या ग्रामस्थांनीही अथक परिश्रम घेतले. टीमवर्कमुळेच ही मोहीम फत्ते झाली.

  वरिष्ठांनी केले कौतुक
  रायरेश्वर वस्तीवरील रोहित्र बदलण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे व त्यांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे मुख्य अभियंता श्री. सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता श्री. अरविंद वनमोरे यांनी कौतुक केले आहे.