महाबळेश्वर सफारी आता होणार पारदर्शक बसमधून; राज्य परिवहन मंडळाचा विशेष उपक्रम

सातारा जिल्ह्याला वरदान लाभलेल्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या पर्यटकांना येथील निसर्ग न्याहाळता यावा, मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पारदर्शी बस त्यांच्या सेवेत दाखल केली आहे.

    सातारा : सातारा जिल्ह्याला वरदान लाभलेल्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या पर्यटकांना येथील निसर्ग न्याहाळता यावा, मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पारदर्शी बस त्यांच्या सेवेत दाखल केली आहे. सध्या महाबळेश्वरमधील निसर्गसौंदर्याचा पर्यटकांना आनंद घेता येणार आहे. त्यानंतर ती जिल्ह्याच्या इतर ठिकाणी सुरू करण्याचे नियोजन आहे.

    सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान भरभरून लाभले आहे. येथील थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर, पाचगणी जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक महाबळेश्वरला येतात. येथील उंच-उंच डोंगररांगा, काळजाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, डोंगरावरून फेसाळत वाहणारे धबधबे, घनदाट जंगल आणि पशुपक्षी पाहणे मनाला अधिक भावते. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवल्यानंतर पर्यटक किल्ले प्रतापगड, वाई, पाचगणी, तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये कासला भेट देतात.

    खासगी वाहनाने येणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी विदेशी, तसेच पुणे-मुंबई येथील पर्यटक शिवशाहीने महाबळेश्वरात येतात आणि येथे येऊन टॅक्सीने पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटन करताना छोट्या काचेतून जेवढे दिसेल तेवढाच निसर्ग पाहता येतो. यामध्ये येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या ताफ्यात पारदर्शी गाडी दाखल केली आहे. गाडीचे छत आणि बाजूला खालीपर्यंत काच वापरलेली ही बस बुधवारी सातारा विभागात आली. या गाडीची सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केल्यानंतर ती पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. गाडीत बसून पर्यटकांना पूर्वीपेक्षा अधिक निसर्ग अनुभवता येणार आहे.