महादेव जानकार लोकसभेच्या रिंगणात, ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. 

  मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर जोरदार टक्कर दिली होती. 2024 च्या निवडणुकीत ते पुन्हा बारामतीतून लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती.

  पण जानकरांनी आता बारामतीला रामराम केल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यांनी थेट मराठवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड येथे माध्यमांशी बोलताना जानकर यांनी याबाबत माहिती दिली.

  महादेव जानकर नेमकं काय म्हणाले? 

  आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच म्हणाले, परभणी, माढा, सांगली या जागांवर आमचा पक्ष स्वबळावर लढणार आहे. मराठवाड्या मध्ये आमची ताकद आहे. त्यामुळे परभणीतील कार्यकर्त्यांनी मी तिथून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह केला आहे. माझाही मानस परभणीतून निवडणूक लढवण्याचा आहे. आमचं प्रत्येक जिल्ह्यात खातं कसं उघडेल, याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण शिबीरं सुरू आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही दौरे सुरू असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केलं.

  परभमीमध्ये सध्या शिवेसेनेचे संजय जाधव हे खासदार आहेत. त्यामुळे जानकर थेट शिवसेनेला टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद आहे. जाधव यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता.

  दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. सुळे यांना केवळ 67 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. जानकर यांनी ऐनवेळी निवडणुकीत उतरून मिळवलेली मतं लक्षणीय होती. त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. मागील काही दिवसांपासून जानकर पुन्हा बारामतीत सक्रीय झाले होते. पण त्यांनी आता परभणीतून लढण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.