महाडिक, कोरे व आवाडे युतीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवीन दिशा मिळेल : महादेवराव महाडिक

महाडिक, कोरे व आवाडे या युतीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक नवीन दिशा मिळेल, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाडिक, कोरे व आवाडे या युतीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक नवीन दिशा मिळेल, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी व्यक्त केले. ते शिरोली येथील महाडिक कार्यालयात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी हातकणंगले तालुक्यातून सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील लाटवडेकर हे होते.

    ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील काही राजकीय लोकांना महाडिक, आवाडे, कोरे यांची युती होऊ नये असेच वाटत होते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे खो घातला होता. पण उशिरा का होईना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमची युती झाली आहे. यामुळे जिल्ह्यात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.‌ जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वच नेत्यांची भुमिका आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कांही ठिकाणी बिनविरोध तर काही ठिकाणी लढत होईल असे चित्र पहावयास मिळत आहे. आपण जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना गटातटाचा विचार न करता सहकार्य केले आहे.‌ त्यामुळेच माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना आवाडे, कोरे व महाडिक गटाचे ११५ ठराव धारक उपस्थित आहेत.‌ घरगुती कार्यक्रम असल्याने सहाजणांनी फोनवरून पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे १३६ पैकी १२१ ठराव आपल्या बाजूने असल्याचा दावा महाडिक यांनी केला.

    यावेळी वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी आमदार डॉ. विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष व पेठवडगाव बाजार समितीचे माजी सभापती विलासराव खानविलकर यांनी आमदार प्रकाशराव आवाडे यांची ताराराणी आघाडी यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पाठींबा जाहीर केला.

    याप्रसंगी माजी आमदार अमल महाडिक, वारणा साखर कारखाना संचालक सुभाष उर्फ मामा पाटील, वारणा बॅंकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील, आण्णासाहेब गोटखिंडे, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, श्रीकांत सावंत, प्रताप उर्फ बंटी पाटील, शिवाजीकाका पाटील, संभाजी महाडिक, प्रकाश कौंदाडे, सुभाष भापकर, नंदकुमार पाटील, उदय पाटील, भगवान पाटील, नितीन चव्हाण आदीसह ११५ ठरावधारक उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले आभार दिलीप पाटील यांनी मानले.