महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे : एकनाथ शिंदे  

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्यानंतर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्यानंतर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे, असेही शिंदे म्हणाले. तसेच कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध करतो. बंगळुरु मधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचे स्तोम थांबवावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही

    शिंदे म्हणाले की, मराठी जनतेवर अन्याय करून आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. दरम्यान, विटंबना केल्याची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील चौकातील या पुतळ्याची गुरूवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचे चित्रिकरण व्हायरल झाल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले.