माझ्या हातात बँकेचे नेतृत्व येवू नये म्हणून महाविकास आघाडीची खेळी; प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

मुंबै बँकेत गेली काहीवर्ष वर्चस्व गाजविणा-या भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारने हा डाव साधल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

  मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदी महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमदेवार प्रसाद लाड यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबै बँकेत गेली काहीवर्ष वर्चस्व गाजविणा-या भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारने हा डाव साधल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  असे पराभव होत असतात आणि सूत्रे नव्या लोकांकडे जात असतात. त्यामुळे यापुढे बँकेच्या उत्कर्षासाठी योग्य ते योगदान देवू असेही दरेकर म्हणाले.

  ही निवडणूकही बरोबरीत झाली असती

  दरेकर म्हणाले की, राज्यात जसे भाजपसोबत निवडणूक लढवून शिवसेनेने ऐनवेळी साथ सोडली तसेच आता मी विरोधी पक्ष नेता असल्याने माझ्या हातात बँकेचे नेतृत्व येवू नये म्हणून महाविकास आघाडीने खेळी केली. यामध्ये आम्हाला उपाध्यक्ष पदासाठी सारखीच दहा-दहा मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत फार फरक आहे असा भाग नाही. फक्त अध्यक्षपदाच्या २ मतांसाठी भाजपचे विष्णू भुमरे यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. नाहीतर ही निवडणूकही बरोबरीत झाली असती आणि अध्यक्षही नाणेफेकीवर निवडून आला असता. असेही यावेळी दरेकर म्हणाले.

  दबाव तंत्राचा वापर

  अजित पवार यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष लक्ष घातल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि सरकारी यंत्रणेकडून दबाव आणल्याने हा निकाल आला. फुटलेली व्यक्ती दोन दिवसापासून गायब होती. त्यामुळे त्याचवेळी याची कल्पना मला आली होती. मला लक्ष करण्याचा प्रयत्नही झाला. जेवढ्या चौकशा अस्तित्वात आहेत त्या सर्व लावल्या, नोटीसा पाठवल्या. अपात्र ठरवले गेले इतर काहीच बाकी ठेवले नाही. मतदारांच्या संस्थांनाही सरकारने नोटीसा पाठवल्या, असाही आरोप दरेकर यांनी केला आहे.

   तो विषय आता संपुष्टात आला आहे.

  त्यापूर्वी मजूर संवर्गातून निवडणूक लढवून जिंकल्यानंतर दरेकरांना सहकार विभागाने नोटीसही पाठवली होती. त्यामुळे त्यानी त्या पदाचा राजीनामा दिला होता. दरेकर म्हणाले,  की, मी दोन ठिकाणांहून निवडणून आलो होतो. त्यानंतर मी संबंधीत आरोप झालेल्या मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. त्यामुळे तो विषय आता संपुष्टात आला आहे.