वाकड, ताथवडेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुधारित ‘डीपीआर’ करा : श्रीरंग बारणे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मावळ लोकसभा मतदारसंघातून जात आहे. मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते.

    पिंपरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मावळ लोकसभा मतदारसंघातून जात आहे. मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारीत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केली. त्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तत्काळ सुधारित डीपीआर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

    खासदार बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज (गुरुवारी) भेट घेतली. महामार्गावरील वाकड, ताथवडे येथील वाहतुकीची समस्या त्यांना सांगितली. त्यावर गडकरी यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. सुधारीत डीपीआर करावा, रस्त्याचे काम वेगात करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

    खासदार बारणे म्हणाले, पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतचे काम ‘सुवर्ण चतुष्कोण’ या रस्तेबांधणी प्रकल्पाअंतर्गात हाती घेतले होते. हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायंन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे. देहूरोड आणि वाकड पर्यंतचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहे. वाकड ते चांदणी चौकापर्यंतचे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत आहे.

    या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान 12 अंडरपास आणि ओव्हरब्रीज आहेत. त्यातील माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्ताचा सुधारीत डीपीआर बनविण्यात यावा. नवीन डीपीआर बनविल्यास वाहतूक कोंडीची समस्या संपेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.