उद्धव ठाकरे आजारी असल्याने फडणवीसांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवलेंची मागणी

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय महाविकास आघाडी सरकारला सुचवला आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या आजारामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजर राहू शकले नाहीत. यावर भाजप नेते आक्रमक झाले असून तोपर्यंत मंत्रीमंडळातील एखाद्या मंत्र्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

    दरम्यान आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय महाविकास आघाडी सरकारला सुचवला आहे.

    रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? 

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने राज्यात अनागोंदी कारभार सुरु आहे का? अशावेळी मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? असा प्रश्न रामदास आठवले यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर रामदास आठवले म्हणाले, मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

    दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असतानाही महाविकास आघाडी सरकार कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे भाजपकडून कडाडून टीका होताना दिसून येत आहे. यासाठी आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे असे पर्यायही भाजपाने पुढे केले आहेत. मात्र आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.