ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर; मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार

    मुंबई : तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. दिल्लीतही त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे.

    दरम्यान आपल्या पक्षाला पुढे नेत, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सुकाणू समितीमध्ये इतर राज्यातील नेत्यांचा समावेश करता येईल.

    ममता बॅनर्जी यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत अन्य राज्यांमध्ये पक्षाचा प्रवेश वाढवण्यासाठी घटनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सुरू ठेवणार असून विविध राज्यांचा दौरा करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्या महाराष्ट्रात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे.

    शरद पवार यांच्याशिवाय त्या उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार

    तृणमूल काँग्रेसने भाजपशासित राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. देश पातळीवर एक मजबूत विरोधी पक्ष उभा करण्याचा विरोधी पक्षांचा विचार आहे, त्यानुसार हे राजकीय समीकरण आखणं सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशिवाय त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी १ डिसेंबर रोजी मुंबईत उद्योगपतींना भेटतील आणि त्यांना पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.