
माण तालुक्यातील शेतकरी कमी पाण्यावर चतुरपणे शेती करत आहे. माणमध्ये विविध संस्था संघटनानीही एकत्र येत जलसंधारणावर काम केले आहे.
दहिवडी : उर्किडे ता. माण येथे माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश सुभेदार यांनी डोंगरावरच्या ८ एकर क्षेत्रात त्यांनी डीपसीसीटी करून त्यात ३ हजार केशर आंब्याची लागवड केली आहे. तसेच हा त्यांचा प्रयोग आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे.
माण तालुक्यात उकिर्डे सुभेदारवस्तीवरील विठ्ठल मळ्यात अविनाश सुभेदार यांच्या शेतातील शेततळे, मत्स्यपालन, फळबागा तसेच बिदाल येथील बुवा नांगरे यांचा मल्चिंगवरचा कांदा, मार्डीतील सहा शेतकऱ्यांची निर्यातक्षम ठरलेली रेस्युड्यू फ्री डाळींब पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे माजी सह मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसीलदार सुर्यकांत येवले, कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंग म्हणाले, माण तालुक्यातील शेतकरी कमी पाण्यावर चतुरपणे शेती करत आहे. माणमध्ये विविध संस्था संघटनानीही एकत्र येत जलसंधारणावर काम केले आहे. उर्किडे येथे सुभेदार यांनी आंबा, चिकू, शेवगा, नारळासह तीन कोटी लिटर क्षमतेची शेततळी बनवली असून, त्यात मत्स्यपालन केले आहे.
बिदाल ता. माण येथील शेतकऱ्याने पाण्याची व मजूराची बचत करत मल्चिंगवरती कांदा लागवड केली आहे. तर मार्डीतील फळबाग लागवड धारक शेतकऱ्यांनी रेस्युड्यू फ्री डाळींब पिकवल्याने त्यांची डाळींब परदेशात जाणार आहेत. कमी पाण्यावर शेतीतून कोट्यावधी रूपये मिळणाऱ्या माणदेशी लोकांचा इतरांनीही आदर्श घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, सातारा पंढरपूर हायवेलगत उजाड डोंगरावर ३३ एकर क्षेत्रात आपण आंबा, चिकू, नारळ, शेवगा, पेरू, लिंबू आदी फळबाग तसेच एक कोटी लिटर पाणी क्षमता असलेली तीन शेततळे उभारत त्यात मत्स्यपालन केले आहे. अजूनही या ठिकाणी विविध प्रयोग राबवत हा परिसर ऍग्री टुरिझम करण्याचा मानस असल्याचेही अविनाश सुभेदार यांनी सांगितले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार अनिल सुभेदार यांनी मानले.