मनोज जरांगे-पाटलांचा शिंदे-फडणवीस-पवारांना इशारा; म्हणाले, ‘याचे परिणाम वाईट होतील…’

मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आढळल्या असून हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असे इशारा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांना दिला.

    अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी मुंबईपर्यंत मोर्चा काढला असून 26 तारखेपासून उपोषण सुरु करणार आहे. आज जरांगे पाटील यांच्या मोर्चाने नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असून यावेळी त्यांनी महायुती सरकारला (State Govt) इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आढळल्या असून हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असे इशारा मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांना दिला.

    मोर्चामध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “याआधी मराठा समाजाला आरक्षण असूनही दिलं नाही. आता मिळालेलं असूनही सरकार वेळ मागत आहे. सात महिन्यांपासून सरकार वेळच मागत असेल, तर मराठा समाज थांबू शकत नाही. आता आरक्षण घेऊनच अंतरवालीला माघारी जाणार. अन्यथा मरायलाही मी भीत नाही. इथून पुढे मराठा आरक्षणाचा संघर्ष होऊ नये, म्हणूनच हा लढा आहे.” असे ठाम मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

    पुढे त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा मराठ्यांनी मानसन्मान केला आहे. सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला आहे. मुंबईला जाईपर्यंत सरकारला वेळ आहे. नंतर वेळ देणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मनापासून लक्ष घातलं पाहिजे. बाकीचे शब्दप्रयोग केले, तर तुमच्याविरोधात रोषपूर्ण वातावरण होईल. शासकीय नोंदी आढळल्या असून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास, तर त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारमधील नेत्यांना दिला.