मनोज जरांगे पाटील यांनी गावी परत जाताच साधला संवाद; गृहमंत्री फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा

घरे जाळणे, गाड्या फोडणे यांसारखे गंभीर गुन्हे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांना इशारा दिला.

    जालना : मराठा (Maratha) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली ते मुंबई अशी पदयात्रा करत पुन्हा एकदा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन उभे केले. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून राज्य सरकारने (State Govt) ‘सगेसोयरे’ शब्दासह कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन राजकारण रंगले असून विरोधकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची आरक्षणासाठीची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे.

    माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरे जाळणे, गाड्या फोडणे यांसारखे गंभीर गुन्हे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांना इशारा दिला. सरसकट गुन्हे मागे घेणार नाही, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर तुमचं मत काय आहे? असा सवाल मनोज जरांगे यांना करण्यात आला. त्यावर “क्षणाचाही विलंब न लावता, मग हे आंदोलन सुरू राहणारं… आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. दणका सुरूच राहील,” असा इशाराच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

    मनोज जरांगे पाटील यांनी आपली मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले, “मराठे शांतपणे मुंबईला गेले आणि शांततेत परत आले. त्यांचे कौतुक करतो. कायदा बनवताना सरकारने 15 दिवस वेळ घेतला. सरकारने तज्ज्ञांची मदत घेतली. विरोधक विरोध करत असतात. विरोध करणाऱ्याला शांततेत उत्तर देणार आहोत. अधिसूचनेवर ते हरकती घेत असतील तर आपण पण हरकती घेतल्या पाहिजेत. आपल्याला चार गोष्टी करायच्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा मोठा प्रश्न होता. आपल्याला राजपत्र मिळाले आहे, आता त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे” असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

    “99 टक्के आरक्षण मिळाले आहे पण एक टक्का राहिले आहे. सरकारला माझी विनंती आहे जे राजपत्र काढले. आता त्याची उद्यापासून अंमलबजावणी करण्यात यावी. मराठे तहात हरले नाहीत, तुम्हाला तह कळतो का? असा सवाल करतानाच पोरं गेले आणि आरक्षण घेऊन आले,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर दिली आहे.