जेऊर गावातील अनेक रोहित्र बंद; शेतकरी हतबल

नगर तालुक्यातील जेऊर परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या वसुलीसाठी अनेक रोहित्र बंद (Transformer Not Working) करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाले असून, महावितरण कंपनीने पठाणी वसुली थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

  नगर तालुका / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या वसुलीसाठी अनेक रोहित्र बंद (Transformer Not Working) करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाले असून, महावितरण कंपनीने पठाणी वसुली थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

  जेऊर परिसरात महावितरण कंपनीकडून थकबाकीच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा धडाका धरण्यात आला आहे. रोहित्र बंद केल्याने विद्युतपंपाबरोबर घरातील वीजही बंद करण्यात आल्याने गाव अंधारात बुडाले आहे. अगोदरच ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांबरोबरच इतर पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे.

  महागडी औषधे फवारणी करुन कसेबसे पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरु असून, त्यातच महावितरण कंपनीच्या वतीने रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

  महावितरण कंपनीने पठाणी वसूली थांबवावी

  जेऊर परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असून, सध्याच्या वातावरणाने सर्व पिके रोगाला बळी पडलेले आहेत. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने पठाणी वसुली थांबविण्याची गरज आहे. कांदा पिकाचे उत्पादन हातात आल्यानंतर शेतकरी थकबाकी भरतील तोपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्याची गरज आहे.

  – राजू दारकुंडे, उपाध्यक्ष, भाजप नगर तालुका

  विजेचा लपंडाव; बिलातही तफावत

  शेतकऱ्यांना आठ तास शेतीसाठी वीज देण्यात येते. ती पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे विद्युत पंप चालत नाहीत. तसेच दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असतो. विजेच्या बिलात ही मोठी तफावत आढळून येते. विद्युत पंपाचे बिल कंपनीकडून मोघमपणे देण्यात येत आहेत. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना देखील विद्युत पंपाचे बिल आकारले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.