आता काय केलं संजय राऊतांनी! ज्यामुळे मराठा क्रांती मोर्चा त्यांच्याविरोधात दाखल करणार तक्रार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरुन सध्या नवा वाद सुरु झाला आहे. हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

    मुंबई : ऐन हिवाळ्यात मुंबईचं तापमान वाढलेलं असताना आता मुंबईच राजकीय तापमानही वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Faction) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडिओमुळे असं होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओवर मराठा क्रांती मोर्चाने (Marath Kranti Morcha) आक्षेप घेतला असून आज त्यांच्याकडून संजय राऊतांविरोधात  शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) तक्रार दाखल करण्यात येणार आहे. नेमंक काय आहे हे प्रकरण पाहूया.

    संजय राऊतांनी शेयर केलेल्या व्हिडिओत काय?

    भाजपकडून महापुरुषांबद्दल सातत्यानं होणाऱ्या विधानांविरोधात शनिवारी, 17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला तुरळक प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. भाजपने मोर्चाला गर्दीच झाली नसल्याचा दावा करत केला तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅनो मोर्चा’ संबोधत विरोधकांना टोला लगावला होता. फडणवीसांच्या टोल्याला प्रत्त्युत्तर देणासाठी महाविकास आघाडीने काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, संजय राऊत यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ हा मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत असून आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राऊत यांच्याविरोधात आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

    तो व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चातला  – भाजप

    महाविकास आघाडीचा मोर्चा असल्याचं सांगत संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चातला असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी या विरोधात या व्हिडिओवरून ठाकरे गटावर निशाणा साधला असून संजय राऊतांवर त्यांनी टीका केली आहे.  संजय राऊत यांनी मराठा समाज, मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाचा अपमान केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे. सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत लाड यांनी ही मागणी केली आहे.