मराठवाड्यातील नेत्यांनी घोटाळ्यातील पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले; किरीट सोमय्यांचा दावा

किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक मोठा दावा केला आहे. मारठवड्यातील काही नेत्यांनी घोटाळ्यातील २० कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या अनेक नेत्यांवर त्याच सोबत मंत्र्यांवर घोटळ्याप्रकरणी आरोप करत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे आपण बघत आहोत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी औरंगाबादचा दौरा केला होता, यावेळी त्यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

    दरम्यान किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक मोठा दावा केला आहे. मारठवड्यातील काही नेत्यांनी घोटाळ्यातील २० कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

    सोमय्या नेमकं काय म्हणाले? 

    घोटाळ्यातील २० कोटी रुपयांची संपूर्ण माहिती आपल्या जवळ आहे आणि ती माहिती आता दिल्लीमध्ये जाऊन देणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ईडी कार्यालय , फायनान्स मिनिस्ट्री त्याच सोबत इन्कम टॅक्स कार्यालयात जाऊन घोटाळ्यातील २० कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवल्याची माहिती देणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

    मराठवड्यातील नेमक्या कोणत्या नेत्यांवर किरीट सोमय्या यांचा रोख होता ते त्यांनी स्पष्ट सांगितले नाही, मात्र अशोक चव्हाण यांच्या बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

    अशोक चव्हाण यांच्याबद्दल बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, अशोक चव्हाण यांचे बुलडाणा को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी धर्माबाद ब्रांच, शेकडो कोटींचे कर्ज आणि अशोक चव्हाण यांचे जे मित्र परिवार आहेत ज्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी घातल्या होत्या त्यातून खूप काही बाहेर आले आहे. त्यामुळे आता पाहूया अशोक चव्हाण यांचं काय होणार, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे.