मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

मराठवाड्यात येणाऱ्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यातील काही भागांमध्ये गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

    औरंगाबाद : मराठवाड्यात येणाऱ्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यातील काही भागांमध्ये गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही बदललेल्या हवामानाचा फटका बसत आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ४ डिसेंबरपर्यंत मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

    त्याचबरोबर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, विरार, पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होऊन हे वारे पश्चिम बंगाल म्हणजेच कोलकत्याच्या दिशेने जातील. त्यामुळे ३ ते ४ तारखेनंतर वातावरणात अचानक बदल होऊन राज्यभरात अचानक थंडीत वाढ होईल, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.