धनगर आरक्षणासाठी इंदापुर तहसिल कचेरीवर मोर्चा

देशातील इतर पाच राज्यात घटनेमध्ये दुरुस्ती करून देण्यात आलेल्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील धनगड या चुकीच्या शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे.

    इंदापूर : देशातील इतर पाच राज्यात घटनेमध्ये दुरुस्ती करून देण्यात आलेल्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील धनगड या चुकीच्या शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे. या मागणीकरिता सोमवारी (दि.२१) धनगर ऐक्य परिषदेकडून धनगर आरक्षण क्रांती मोर्चा मालोजीराजे चौक ते इंदापूर तहसील कचेरी असा काढण्यात आला.

    यावेळी धनगर ऐक्य परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे, संजय रुपनवर, विशाल मारकड, कुंडलिक कचरे,आप्पा माने, महेंद्र रेडके, मोरेश्वर कोकरे, गजानन वाकसे, हेमंत वाघमोडे, सिताराम जानकर, विष्णू पाटील, तेजस देवकाते, विजय वाघमोडे आदींसह अन्य धनगर बांधवांच्या सह्यांचे मागण्यांसंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व तहसीलदार श्रीकांत पाटील यांकडे देण्यात आले.मोर्चात मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.

    प्रसंगी बोलताना डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले की,१३ सप्टेंबर रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये देशातील पाच राज्यांमधील घटनेमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी, इंग्रजी मधील शाब्दिक चुका, शब्द उच्चार दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित राज्यातील लाखो लोकांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे ५ डिसेंबर पर्यंत शब्द दुरुस्तीची शिफारस पाठवावी अन्यथा ५ हजार धनगर उजनीमध्ये जलसमाधी करणार यावर ठाम आहेत, असा इशारा तरंगे यांनी शासनाला दिला आहे.

    राज्यकर्त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही….

    आत्तापर्यंत धनगर समाजाने शांत पद्धतीने आंदोलने केली. यापुढे जलसमाधी, रेल्वे रोको, रास्ता रोको अशा स्वरूपाची आंदोलने होतील. गेली सत्तर वर्षे आमची मते घेतली.आत्ता आम्हाला आरक्षण द्या. अन्यथा राज्यकर्त्यांना घराच्या बाहेर पडणं धनगर मुश्किल करेल असा इशारा शशिकांत तरंगे यांनी याप्रसंगी बोलताना दिला.