
म्हसवड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथोत्सव यंदा अगदी मोजक्या भाविकांच्या व पोलीसांच्या बंदोबस्तात संपन्न झाला. यावेळी सिध्दनाथाच्या नावाने चांगभलचा गजर भाविकांतुन मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.
महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणार्या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी कृष्णात गुरव यांच्या घरुन वाजत-गाजत पालखीतुन रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून, अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, विश्वजित राजेमाने, सयाजीराजे राजेमाने रथावर विराजमान झाले होते.
श्री सिध्दनाथाच्या विवाह सोहळ्यानंतर आज रविवार ५ डिसेंबर रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
यंदा रथ नगरप्रदक्षिणेस प्रशासनाने मनाई केल्यामुळे रिंगावण पेठ मैदानावरच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. यावेळी गावातील भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलंच्या गजरात रथावर गुलाल व खोबर्याची उधळण केली. तसेच अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती.
यावेळी भाविक व म्हसवडकर नागरीकांसोबत म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, विजय सिन्हा, विजय धट, सुरेश म्हेत्रे, युवराज सूर्यवंशी, ॲड. निसार काझी, राजू माने, बाबासाहेब माने आदींनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबर्याची उधळण केली.
यावेळी रथाचे दर्शन आमदार जयकुमार गोरे यांनी सप्तनिक घेतले. माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, मानकरी मोहनराव डुबल या मान्यवरांनीही घेतले.
म्हसवड येथील श्री सिध्दनाथ यात्रा प्रशासनाने रद्द केल्यानंतर आक्रमक झालेल्या म्हसवडकरांपुढे प्रशासनाने नमते घेत येथील यात्रा पटांगणावर रथ फिरवण्यास प्रशासनाने मंजूरी दिली त्यामुळे शहरात सिध्दनाथ रथ फिरणार असा मेसेज चांगलाच व्हायरल झाल्याने प्रशासनाने भाविकांची गर्दी होऊ नये याकरीता ४ डिसेंबर रोजीच्या रात्री शहरात येणारे सर्व रस्ते बँरीगेट लावुन बंद केले. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या भाविकांना मोठी पायपिट करावी लागली. तर प्रशासनाने सिध्दनाथ यात्रा भरु न दिल्याने या भाविकांना पायपिट करताना कोठेही पिण्याचे पाणी उपलब्ध होवु शकले नाही.
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळेच सिध्दनाथाच्या रथाच्या भेटीसाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या यंदा शहरात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे भाविकांतुन नाराजी व्यक्त करण्यात आली, तर रथाची नगरप्रदक्षणाही प्रशासनाने रद्द केल्याने भाविक व म्हसवडकर नागरीकांतुन संतापही व्यक्त करण्यात आला.
कोरोना व्हेरीयंटचे कारण पुढे करीत प्रशासनाने यात्राच रद्द केल्याने यात्रा पटांगण सुन्न दिसत होते रथाला बँरीगेट लावुन लांबुनच भाविकांनी गुलाल खोबरे उधळण्याचे प्रशासनाने आवाहन केल्याने यंदा बाहेरुन आलेल्या भाविकांना श्रींचा रथ ओढता आला नसल्याची खंत अनेक भाविकांनी बोलुन दाखवली तरी ही गतसाली रथोत्सव झाला नव्हता यंदा तो होतोय याचेही समाधान भाविकांमध्ये होते.
प्रशासनाने रथाला अडवले तर पोलीसांनी भाविकांना नाडवले
प्रशासनाने यंदा रथाच्या नगरप्रदक्षणेला आक्षेप घेत भाविकांना रथाचे फक्त दर्शन घेण्यास मुभा दिली होती त्यामुळे प्रशासनानेच रथोत्सव हाणुन पाडल्याच्या भावना भाविकांमधुन येत होत्या तर मंदिरात मात्र श्रींचे दर्शन सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले त्यामुळे दर्शनासाठी बाहेरुन येणार्या भाविकांना पोलीसांनी शहराबाहेरच अडवल्याने त्यांना मोठी पायपिट करावी लागली.
प्रशासनाने स्थानिक दुकानदारांनाही नाडवले
शहरात यात्रा जरी होणार नसली तरी शहरातील नेहमीची दुकाने सुरुच राहतील असे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आल्याने मंदिर परिसरातील व्यावसाईकांनी आपली दुकाने नेहमीप्रमाणे सुरु ठेवली असताना प्रशासनाने याठिकाणी अचानकपणे येवुन दुकानदारांवर अरेरावी करीत दुकाने आत घ्या अन्यथा भरुन नेवु अशी दमबाजीही केली.
शहराला पोलिस छावणीचे स्वरुप
यंदा पोलीस प्रशासनाने म्हसवड शहरावर कब्जा मिळवल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता गावात येणाऱ्या स्थानिकालाही ओळखपत्र दाखवावे लागत होते.
महिला पोलीसांची कुचंबना
रथोत्सवानिमीत्त शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला असुन या मध्ये अनेक महिला पोलीसांचा समावेश आहे, या महिलांची ज्याठिकाणी राहण्याची सोय केली होती. त्याठिकाणी स्वतंत्र शौच्छालयाची व्यवस्था नसल्याने अनेक महिला पोलीसांची यामुळे कुचंबना झाल्याचे पोलीसांनी सांगितले.
पोलिस व स्थानिकांत अनेकदा वाद
रथोत्सवानिमीत्त शहरात येणारे सर्व रस्ते पोलीसांनी बंद तर केलेच होते पण शहरातुन जाणारा सातारा – पंढरपुर हा मुख्य रस्ताही पोलीसांनी अचानकपणे बंद केल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय झाली अनेकांना रुग्णालयातही सहज जाता न आल्याने अनेकदा स्थानिकांची व पोलीसांची वादावादी झाली.
मानकऱ्यांना रथावरुन खाली उतरवले
श्रींच्या रथावर येथील माळी, लोहार, सुतार आदी समाजाचा मान असल्याने त्यांना रथावर मानकरी म्हणुन बसवले जाते आज रथावर उधळलेले गुलाल खोबरे गोळा करण्यासाठी हे मानकरी रथावर बसले असताना उप विभागीय पोलिस अधिकऱ्यांनी या सर्वांना रथावरुन खाली उतरवल्याने या मानकऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली.