साहित्य खरेदी घोटाळा : ८ हजार रुपये किमतीचा कुलर तब्बल ७९ हजारांत खरेदी केला

महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच नगरसेवक संदीप सहारे यांनी सोमवारी महापालिकेने खरेदी केलेले कुलर, पेन, स्टॅपल पिन, चहाचा ट्रे, टर्किश टॉवेल, चहाचे कप आदींचे दर सांगितले. विशेष म्हणजे, सहारे यांनी याच वस्तूंचे कोटेशन बाजारातून विविध एजन्सी व कंपनीकडून मागितले. महापालिकेने खरेदी केलेल्या साहित्याचे दर व बाजारातील दरात मोठी तफावत आढळून आली आहे.

    नागपूर (Nagpur) : महापालिकेतील साहित्य खरेदी घोटाळ्यातील एकाहून एक धक्कादायक माहिती आता पुढे येऊ लागली आहे. बाजारात आठ ते साडेआठ हजार रुपयांत मिळणारा कुलर चक्क ७९ हजारांत खरेदी करण्यात आला. महापालिकेने माहिती अधिकारात काँग्रेस नगरसेवक संदीप सहारे यांना दिलेल्या माहितीतून कुलरच नव्हे तर इतर साहित्यखरेदीचे दरही अ‌व्वाच्या सव्वा असल्याचे पुढे आले.

    महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच नगरसेवक संदीप सहारे यांनी सोमवारी महापालिकेने खरेदी केलेले कुलर, पेन, स्टॅपल पिन, चहाचा ट्रे, टर्किश टॉवेल, चहाचे कप आदींचे दर सांगितले. विशेष म्हणजे, सहारे यांनी याच वस्तूंचे कोटेशन बाजारातून विविध एजन्सी व कंपनीकडून मागितले. महापालिकेने खरेदी केलेल्या साहित्याचे दर व बाजारातील दरात मोठी तफावत आढळून आली आहे. स्टेशनरी व कुलर खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाला.

    माहिती अधिकारात महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ४० लिटर क्षमतेचे कुलर ५९ हजार रुपयांत खरेदी करण्यात आले. त्यांची किंमत बाजारात ८ हजार २४ रुपये आहे. १२० लिटर क्षमतेचे कुलर महापालिकेने ७९ हजार रुपयांत खरेदी केले. त्यांची किंमत बीएम इंडस्ट्रिजकडून मागविण्यात आलेल्या कोटेशनमध्ये ८ हजार ४९६ रुपये असल्याचे दिसून येते. याशिवाय सध्या गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्यातील साहित्याची किंमतही आठ ते दहा पटीने वाढविण्यात आल्याचे सहारे यांनी सांगितले.

    दोन रुपयांचा पेन साडेनऊ रुपयांत
    सहारे यांनी महापालिकेकडे २०१७पासूनची साहित्य व स्टेशनरी खरेदीसंदर्भातील माहिती २०१९मध्ये मागितली होती. महापालिकेने दिलेल्या एकूण माहितीपैकी सहारे यांनी १३ जुलै २०१७ ते ९ ऑक्टोबर २०१७ या काळात खरेदी केलेल्या साहित्यांची माहिती सांगितली. महापालिकेने ९.५० रुपये प्रतिनग एक, यानुसार दोन हजार पेन खरेदी केले. बाजारात या पेनची किंमत १.९५ रुपये असल्याचे सहारे म्हणाले. प्लास्टिक फोल्डर बॅगा महापालिकेने प्रतिनग १८७ रुपये दराने खरेदी केल्या. या शंभर बॅगा खरेदी करण्यात आल्या. बाजारात या फोल्डर बॅगची किंमत १० रुपये आहे. जेल पेनची खरेदी प्रती नग ३४ रुपये दराने करण्यात आली. या पेनची बाजारात किंमत केवळ ३ रुपये आहे. ही केवळ एका महिन्याची माहिती असून संपूर्ण वर्षभरातील खरेदीत कोट्यवधीचा अपहार झाल्याचा आरोप सहारे यांनी केला.