नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पालिकेला केले अलविदा; पंचवार्षिक मुदत आज संपणार

सातारा पालिकेच्या ४० नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत अधिकृतरित्या शनिवारी संपत आहे. परिणामी, आज सातारा पालिकेत अगदीच निरोप समारंभाचे वातावरण होते. प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी नगराध्यक्ष माधवी कदम यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.

    सातारा : सातारा पालिकेच्या ४० नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत अधिकृतरित्या शनिवारी संपत आहे. परिणामी, आज सातारा पालिकेत अगदीच निरोप समारंभाचे वातावरण होते. प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.

    शुक्रवारी सकाळच्या सत्रात सत्ताधारी सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी यांच्या नगरसेवकांची लगबग सुरु होती. पाच वर्षांपूर्वी 22 डिसेंबर रोजी माधवी कदम यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. 27 डिसेंबरपासून पालिकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली होती. त्यानुसार, सत्ताधारी सातारा विकास आघाडीची मुदत 27 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. मात्र, त्या दिवशी रविवारची आठवडा सुट्टी आल्याने शुक्रवारीच पालिकेत नगरसेवकांना निरोप देण्याचा भावपूर्ण वातारवण होते. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सकाळीच पालिकेत येऊन नेहमीप्रमाणे प्रलंबित कामांचा आढावा घेतला. तर नगराध्यक्ष माधवी कदम यासुद्धा सकाळपासूनच दालनात उपलब्ध होत्या.

    काही प्रलंबित प्रकरणावर स्वाक्षऱ्या इतर गाठीभेठींचे त्यांचे सत्र सुरुच होते. विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी नगराध्यक्षांची गाठ घेऊन गेले. पाच वर्षे जे सहकार्य मिळाले त्याबद्दल आभार मानले. दुपारी दीड वाजता लेखा विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांची गाठ घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

    प्रशासनाच्या उत्तम सहकार्याबद्दल नगराध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले. मुख्याधिकारी अभिजीत बापट, लेखाधिकारी आरती नांगरे, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील, अर्तगत लेखापरीक्षक कल्याणी भाटकर, शैलेश अष्टेकर, अमोल लाड, नगरसेविका स्नेहा नलावडे यावेळी उपस्थित होते.