सोलापुरात यंदा महापौर चषक क्रिकेट स्पर्धा

अनेक वर्षांपासून बंद असलेला महापौर चषक यंदाच्या वर्षी क्रिकेट लिगच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम (Shrikanchana Yannam) यांनी दिली.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनेक वर्षांपासून बंद असलेला महापौर चषक यंदाच्या वर्षी क्रिकेट लिगच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम (Shrikanchana Yannam) यांनी दिली.

    सोलापूर महानगरपालिकेच्या स्टेडियम कमिटीची सभा गुरुवारी सायंकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे एसडीओ हेमंत निकम, सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे, सहाय्यक आयुक्त नानासाहेब माहनवार, क्रीडा अधिकारी नजीर शेख, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु सदस्य हाजीमलंग नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

    स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क स्टेडियम या मैदानाचे काम पूर्ण झाले असून, हे मैदान स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने लवकरात लवकर मैदान खुले करावी, अशी मागणी यापूर्वी केली होती. त्यामुळे लवकरात लवकर क्रिकेट खेळाडूसाठी मैदान खुले करावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. पार्क स्टेडियम येथील मुख्य पीच व सराव पिच आठ ते दहा क्रिकेट सराव सामने होण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. सर्वांच्या मताने सोलापूर प्रीमियर लीग घेण्यात येणार असून, त्याला महापौर चषक असे नाव देण्यात आले आहे.