शरद पवार- संजय राऊत यांच्यात बैठक; नेमकी काय चर्चा झाली? : वाचा सविस्तर

    मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आज  शिवसेना खासदार संजय राऊत यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. मात्र यावेळी कोणत्याही राजकीय मुद्यांवर नव्हे तर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी राजकीय वर्तुळात पवार आणि राऊत यांच्यात एसटी संपापासून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यापर्यंत आणि मुख्यमंत्री बदलापर्यतच्या अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगणा-या चर्चाचे पेव फुटले होते.

    दोन दिवसांत तीन पक्षांच्या समन्वय समितीची बैठक 

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांना पुन्हा कामकाज सुरू करण्यासाठी दिड दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कार्यभार शिवसेनेच्या अनुभवी नेत्याला देण्याबाबत सध्या चर्चा सुरू असून याबाबत येत्या एक दोन दिवसांत तीन पक्षांच्या समन्वय समितीच्या नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पवार यानी या बैठकीनंतर भुमिका स्पष्ट करण्याबाबत राऊत यांना सांगितल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी अजित पवारां सोबतच्या फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीला २३नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने खा संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.

    राऊत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त

    मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची नुकतीच निवडणूक पार पडली आहे.. खासदार संजय राऊत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त आहेत. या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीत चर्चा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये माजी आमदार विद्या चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, प्रताप आसबे, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्यात मुंबई मराठी ग्रंथ संगहालय निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा विजय झाला होता. तर या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केले. त्यात २९ मते शरद पवार यांना, तर धनंजय शिंदे यांना २ मते मिळाली. याच ग्रंथालयाची निवडणूक पार पडल्यानंतरची ही पहिलीच बैठक घेण्यात आली.