‘शासकीय स्तरावरील मोलाचा आधार हरपला’; आमदार जाधव यांच्या निधनाने व्यावसायिक हळहळे

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाने शिरोली आणि पर्यायाने कोल्हापूरच्या साऱ्या उद्योजकांची न भरून येणारी हानी झाली आहे. उद्योग व व्यापाऱ्यांचा शासकीय स्तरावरचा एक मोठा आधारवड हरपला आहे.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोना महामारीनंतर कच्च्या मालाची दरवाढ ही उद्योगावर आलेली त्सुनामी आहे. वीज बिलात राज्य सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. सरकारने यावर पुन्हा एकदा विचार करावा, अशी ठाम भूमिका मांडणारे उद्योजकांचे हक्काचे लोकप्रतिनिधी आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

    शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) वार्षिक सर्वसाधारण सभेत सप्टेंबर महिन्यात त्यांनी उद्योगावर येणाऱ्या संकटाची कल्पना जिल्ह्यातील उद्योजकांना दिली होती. दिवाळीनंतर कास्टिंगसाठी दरवाढ मिळाली नाही तर उद्योग टिकणार नाहीत. काम आहे म्हणून काम करू नका, तुम्हाला वार्षिक अहवालात येणार्‍या नुकसानीचा अभ्यास करून प्रसंगी उद्योग बंद ठेवा. पण दरवाढ मिळवा असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यांच्या निधनाने उद्योजकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

    शासकीय स्तरावरील मोलाचा आधार हरपला

    आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाने शिरोली आणि पर्यायाने कोल्हापूरच्या साऱ्या उद्योजकांची न भरून येणारी हानी झाली आहे. उद्योग व व्यापाऱ्यांचा शासकीय स्तरावरचा एक मोठा आधारवड हरपला आहे. शासकीय स्तरावरील उद्योजकांच्या कामात त्यांचा मोलाचा आधार होता.

    वर्तमान परिस्थितीत दरवाढीमुळे आणि दराच्या अनिश्चिततेमुळे फाउंड्री उद्योगाची वाताहात सुरू होती. कोरोनाच्या संकटात उद्योजकांना आधार देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील उद्योगाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याबद्दल ते प्रयत्नशील होते.

    – दीपक पाटील, अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर (स्मॅक)

    लाडके आमदार व लोकप्रिय उद्योजकाच्या आकस्मिक जाण्याने मोठे नुकसान

    एक उद्योजक आणि आमदार म्हणून दोन्ही क्षेत्रात चंद्रकांत जाधव यांची कामगिरी यशस्वी राहिली. उत्कृष्ट फुटबॉलपटू असल्याने क्रीडा क्षेत्राची ही त्यांना आवड होती. लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी ते नेेहमी आग्रही असत.
    त्यांच्यातील दातृत्वाचा अनुभव अनेकांनी अनुभवला आहे. कोरोना आणि महापुराच्या काळात त्यांनी अविश्रांत कार्य केले. जिल्ह्यातील अनेक औद्योगिक संघटनेच्या कार्यकारणीत ते कार्यरत होते.

    कोल्हापूर शहराचे लाडके आमदार, लोकप्रिय उद्योजक, उत्कृष्ट खेळाडू, सामाजिक प्रश्नांची जाण असणारे उद्योजकांचे हक्काचे राजकीय नेतृत्व अशी आमदार चंद्रकांत जाधव यांची अष्टपैलू कामगिरी राहिली आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने एक घरचाच माणूस गेल्याची कोल्हापूर उद्यम सोसायटीची भावना आहे.

    – चंद्रकांत चोरगे, उपाध्यक्ष, कोल्हापूर उद्यम को – ऑप सोसायटी

    आमदार जाधव यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राला मोठा धक्का

    आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक इतिहासात पहिल्यांदाच एक उद्योजक आमदार त्यांच्या रुपाने झाला होता. गेल्या दोन वर्षापासून शहरवासीयांच्या तसेच उद्योगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत राहिले. ते एक उत्कृष्ट फुटबॉलपटू तसेच यशस्वी उद्योजक होते. त्यांना उद्योगांच्या प्रश्नांची जाण होती. त्यामुळे ते उत्स्फूर्तपणे हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असत. औद्योगिक वीज दर कमी करण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली असून उद्योग क्षेत्राने एक हक्काचा माणूस गमावला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    – सचिन मेनन, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन

    स्वत:चे शिक्षण कमी असूनही अपार कष्टातून, शून्यातून उद्योगविश्व निर्माण करणारा एक सच्चा आणि धडाडीचा उद्योजक, कारखानदारां पासून ते रिक्षावालाया पर्यंतचे सर्वांचे बारीकसारीक प्रश्नांची जाण असलेले आणि तेच प्रश्न, अडचण राजकीय पातळीवर तळमळीनं सोडवण्याचे सतत प्रयत्न करणारे आपले सर्वांचे लाडके मित्र, जवळचे कारखानदार आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे गोशिमातील त्याचबरोबर कोल्हापूर उद्योगविश्वातील छोट्य़ा-मोठ्य़ा कारखानदारांचे , कामगारांचे, व्यापाऱ्यांचे खऱ्या अर्थानं फार मोठ न भरून येणारे नुकसान झाले आहे.

    – अजय कुलकर्णी, डायरेक्टर, बेसपासक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड.