टीईटी परीक्षासंदर्भात पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला घेतले ताब्यात; सकाळपासून चौकशी सुरू

म्हाडा परीक्षा प्रकरणात पुणे पोलीसांकडून महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास चौकशीला बोलविण्यात आले आहे. त्यांच्यासह एका बड्या अधिकाऱ्याच्या ऍडव्हायझरला देखील बोलविले गेले आहे, असे खात्रीलायक पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

    पुणे : म्हाडा परीक्षा प्रकरणात पुणे पोलीसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास चौकशीला ताब्यात घेतले आहे, असे खात्रीलायक पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, म्हाडा प्रकरणात चौकशी सुरू असताना टीईपी परिक्षा संदंर्भात ही चौकशी सुरू असल्याचे कळते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

    पुणे पोलीसांच्या सायबर शाखेकडून म्हाडा परिक्षेची प्रश्न पत्रिका फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डॉ. प्रितीश दिलीपराव देशमुख (वय ३२, रा. खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. सिंदखेडराजा, जि, बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे म्हाडा प्रकरणात चौकशी सुरू होती. यादरम्यान, टीईटीचा पेपर तसेच जी.ए. सॉफ्टवेअरकडून घेण्यात आलेल्या सर्वच परिक्षांवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. या गुन्ह्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यामार्फत तपास सुरू आहे. पोलीस खोलावर गेले असून, आज सकाळी पुणे पोलीसांनी यात आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे.

    पोलीसांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागातील तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या वरिष्ठांना पहाटे पिंपरी-चिंचवड शहरातून सहाय्यक आयुक्त आणि महिला पोलीस निरीक्षकांनी चौकशीला घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सकाळपासून चौकशी सुरू आहे. परंतु, त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही. चौकशीत काही आढळल्यास त्यांच्या कारवाई करण्यात येणार, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, चौकशी टीईटी पेपर बाबत आहे. म्हाडाचा पेपर चौकशीत टीईटी बाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.