‘सिध्देश्वर’ स्थलांतराचा सल्ला अयोग्य; सुभाष देशमुख यांच्या वक्तव्यावर धर्मराज काडादी यांची प्रतिक्रिया

कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला की, मुद्दामहून राजकीय कुरघोड्यांतून ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा वाद पेटविला जातो. गेल्या पाच गाळप हंगामापासून हा प्रकार सुरू आहे.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आमदार सुभाष देशमुख यांच्याबद्दल आपणास आदर आहे. ते चांगले लोकप्रतिनिधी असतानाही त्यांनी महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर बंगला बांधला आणि पुढे आरक्षण रद्द करून घेतले. पर्यावरणाच्यादृष्टीने त्यांनी एक नवे गार्डन वसविण्याऐवजी आपला बंगला उभारला, हे योग्य नाही. मग, हजारो कुटुंबीयांचा आधार असणारा सिद्धेश्वर साखर कारखाना इतरत्र का स्थलांतरित करायचा, असा प्रश्न उपस्थित करीत कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आमदार देशमुख यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

    शनिवारी, काडादी यांनी त्यांच्या ‘गंगा’ या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ही नाराजी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार देशमुख यांनी आमचे सरकार असताना चिमणीचा वाद निर्माण झाला. त्यावेळी मी स्वतः काडादी यांना भेटलो. कारखाना सोलापूर शहराच्या हद्दीत आहे. ती जागा विकली तर भरपूर पैसे मिळतील आणि सभासदांनाही न्याय देता येईल. कारखाना स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे द्या. त्यासाठीचा खर्च मागा. एवढेच नाही तर 15 किलोमीटरच्या हवाई अंतराची अटही रद्द करतो. इतकेच नव्हे तर तुम्ही आमच्या बाजूला कारखाना टाका, असे मी त्यांना सांगितले होते, असे देशमुख म्हणाले होते.

    त्याला उत्तर देताना काडादी पुढे म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याने को-जनरेशनची चिमणी उभारत असताना वेळोवेळी त्यासाठी आवश्यक असणार्‍या परवानग्या आणि तत्वतः मान्यता आम्ही घेत आलो आहोत. याउलट देशमुख यांनी सोलापूर शहरातील आरक्षित जागेवर बंगला बांधला. देशमुख हे श्रीमंत आहेत. त्यांनी इतरत्र जागा विकत घेऊन बंगला बांधला असता तर सोलापूर शहराच्या पर्यावरणाच्यादृष्टीने एक चांगले गार्डन निर्माण होऊ शकले असते. त्यांनी आरक्षित जागेवर बंगला उभारला, हेे योग्य नाही. ते स्वतः असे वागले असताना हजारो कुटुंबीयांचा आधार असणारा सिद्धेश्वर कारखाना इतरत्र का स्थलांतरित करायचा? लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मतदारसंघात काही ठिकाणच्या पाणी प्रश्नाबरोबरच काही ठिकाणी रस्त्याची कामे केली आहेत. असे असले तरी काम करीत असताना काही गोष्टी पाळायला हव्यात.

    कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला की, मुद्दामहून राजकीय कुरघोड्यांतून ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा वाद पेटविला जातो. गेल्या पाच गाळप हंगामापासून हा प्रकार सुरू आहे. यामागे कोणाची शक्ती आहे, हे माहीत नाही. पण, आम्हाला नाहक त्रास दिला जातो.

    कारखान्याची बदनामी केली जाते. त्यांचा कारखाना स्थलांतर करण्याचा सल्ला कारखान्याच्या दृष्टीने योग्य नव्हता, असेही काडादी म्हणाले.