यापुढे राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

जून 2024 सालापासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

    नाशिक : भाजप पक्षाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत (Girls Education) मोठी घोषणा केली आहे. जून 2024 सालापासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क  (Girls Free Higher Education in Maharashtra) भरावे लागणार नाही. जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबद्दल सांगितले. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    मुलींच्या शिक्षणाबाबत घोषणा करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत लिहिले होते की पैसे नाही शिक्षणासाठी. त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व जात, पंथ, धर्माच्या मुली आता शिक्षण घेऊ शकतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या ६४२ आणि नव्याने सुरु होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही. या निर्णयामुळे मुलींचे शिक्षण प्रमाण वाढेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. या शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला आहे. जर्मनी या देशाला कौशल्य असलेले ४ लाख मनुष्यबळाची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

    याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनेक विषयांवर आपले मत मांडले. ते म्हणाले, राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना या चिंताजनकच आहेत, सरकार त्याबाबत सतर्क आहे. राज्यात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय आहे, शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच मंत्री छगन भुजबल यांच्या  धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम आहे.असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तसेच निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावं, बोलण्याचा पण काही स्तर आहे, पद्धत आहे. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.