mns burns mulund toll naka

महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडिओ दाखवले होते.

    मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टोलबाबतच्या (Toll) इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी (MNS supporters) मुलुंड टोलनाका पेटवला आहे. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    टोलनाके जाळण्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य
    आजच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत भाष्य केलं. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसैनिकांनी सगळ्यात आधी मुलुंड टोलनाका पेटवून दिला.

    अविनाश जाधवांचा आक्रमक पवित्रा
    टोलच्या मुद्द्यावरुन मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर रस्त्यावर उतरुन टोलनाक्यांची पाहणी केली. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन सुरु केलं. लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली. दुपारी अविनाश जाधव यांनी आंदोलन केल्यानंतर, संध्याकाळी मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवला. यावेळी अविनाश जाधव तिथे नव्हते.

    मुंबईसह राज्यभरात मनसैनिक आक्रमक
    राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी जुन्या मु्ंबई-पुणे हायवेवर (Mumbai – Pune highway) असलेल्या शेडूंग टोल नाक्यावर (Shedung Toll) आंदोलन सुरु केलं. मनसेने शेडूंग टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांना विनाटोल सोडण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले.

    राज ठाकरेंचं म्हणणं काय?
    महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडिओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू”.

    देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं काय?
    आम्ही केलेल्या टोलमुक्तीच्या घोषणेनुसार राज्यातील सर्व टोल नाक्यांवर छोट्या गाड्यांना आम्ही टोलमुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.