महंमद शमी एक ‘अनसंग’ हिरो !

विविध रंगांचा, ढंगाचा विश्वचषक आज संपतोय. स्वप्नवत ठरलेला हा आगळा वेगळा विश्वचषक म्हणावा लागेल. अनेकांना संपविणारा तर कित्येकांना हिरो करणारा. असे अनेक हिरो या विश्वचषकाने दिले. काही अप्रकाशित हिऱ्यांना पुढे आणले आणि भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महंमद शामीला या विश्वचषकाने वेगळ्याच रुपात पेश केले. २०१५ पासूनचे त्याचे आयुष्य, घटना आणि परिणाम पाहिले तर हा माणूस जिवंत कसा राहीला याचे आश्चर्य वाटते. भारतीय क्रिकेटमधील हा अप्रकाशित तारा, खरं तर 'अनसंग हिरो'च.

  महंमद शमी एक ‘अनसंग’ हिरो ऑस्ट्रेलियातील २०१५चा विश्वचषक संपला आणि महंमद शामीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ‘घर फिरलं की वासेही फिरतात’ असं म्हणतात. पण शामीचे घर फिरले पण वासे फिरले नाहीत. घर म्हणजे त्याचे बिऱ्हाड, त्याची जीवनसाथी फिरली. एक मॉडेल हसीन जहाँ त्याची पत्नी होती. तिने त्याच्यावर आरोपांची गरळ ओकली. तो राष्ट्रद्रोही आहे. मॅचफिक्सिंगमध्ये सामील आहे. त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत. त्याने मला मारहाण केली, असे अनेक अश्लाध्य आरोप त्याच्यावर करण्यात आले.

  दुसरीकडे त्याला गुडघेदुखीची समस्या उद्भवली. शारीरिक आघातापेक्षाही मानसिक आघात असह्य होते. त्याने तीनवेळा आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. कारण त्याच्या पत्नीच्या आरोपांनी त्याला निर्णय होण्याआधीच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आणि आपल्या देशात एखाद्याला प्रसिद्धिमाध्यमांनी दोषी ठरविले की मग सर्वजण त्याला गुन्हेगाराची वागणूक द्यायला लागतात.
  अशावेळी त्याच्या पत्नीने त्याला या संकटात लोटले होते. ती त्याला आणखी जर्जर करीत होती. मात्र त्याचे कुटुंबिय, आई-वडील त्याच्या पाठीशी उभे राहीले. त्याचे घर २४व्या मजल्यावर होते. तो तेथून खाली उडी मारील अशी भीती त्यांना सतत वाटायची. त्यामुळे त्याच्यासोबत एक सदस्य कायम, सावलीसारखा रहायचा.
  २०१५ पासूनचा त्याचा हा खडतर मानसिक, तणावग्रस्त प्रवास अगदी कालपरवापर्यंत सुरू होता. त्याची गुडघेदुखी, पाठदुखीही पाठ सोडत नव्हती. एका फिझिओला विचारल्यावर त्याने म्हटले होते; खरं तर शामीची दुखापत फार मोठी नाही. अल्पावधीतच ठिक व्हायला हवी होती. परंतु, त्याच्या मागे जे शुक्लकाष्ट लागले आहे, त्यामुळे दुखापत बरी होत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असली की तिला औषधांचे गुण देखील येत नाहीत. कारण शरीरही त्या औषधांना प्रतिसाद देत नाही.

  त्याचे मानसिक पातळीवरील युद्ध नव्हते तर तो एक महासंग्रामच होता. पत्नीने मीडियाची फौजच त्याच्याविरुद्धच्या लढाईत मैदानात उतरविली होती. नको ते आरोप त्याच्यावर करण्यात येत होते. क्रिकेट तर संपलंच होतं. पण जीवनही संपविण्याच्या मागे होते. या अनुभवातून गेलेल्या विराट कोहलीला त्याची अगतिकता समजत होती. प्रसिद्धीमाध्यमे कशी हात धुवून मागे लागतात हे त्यानेही अनुभवले होते. त्यात शामीचा ‘धर्म’. त्याच्याकडे अनेक नजरा हेतुपुरस्सर संशयाने वळविण्यात आल्या.

  अशावेळी त्याचे घरचे त्याच्यासोबत होतेच. पण विराटही पाठीशी खंबीरपणे उभा राहीला. बीसीसीआयने त्याच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करून त्याला दोषमुक्त ठरविले. विराट आणि त्याची पत्नी यांनी शामीला धीर दिल्यानंतर त्या दोघांवरही सोशल माध्यमांच्या आधारे टिका करण्यात आली होती. पण विराट डगमगला नाही. त्याने संघांतील वातावरण बिघडवू नये यासाठी जाहीरपणे स्पष्ट भूमिका घेतली.
  तेथेच शामीला आपल्यासोबत आपले सहकारीही आहेत याची सर्वप्रथम जाणीव झाली. मग तो जिम्नॅशियममध्ये नियमित जायला लागला. दुखापतींसाठीचे व्यायाम करायला लागला. गोलंदाजीत त्याने अनेक बदल केले, जे दुखापतींमधून बाहेर आल्यानंतर उपयुक्त ठरू शकतात.

  प्रत्येक गोष्टीसाठी त्याला झगडावे लागले. त्याच्या क्रिकेटची सुरुवातच मुळी अशी झाली. उत्तर प्रदेशच्या अमरोहा गावातला हा युवक. वडिलांना त्याच्यासाठी वेगवान गोलंदाजीसाठी आवश्यक असणारी रग दिसली. त्यांनी मोरादाबादच्या एका प्रशिक्षकाकडे त्याला नेले. बदरुद्दीन सिद्दीकी नामक प्रशिक्षकाला हा महंमद शामी आवडला. कारण तो वेगवान गोलंदाजीसाठी खूपच मेहनत घ्यायचा. १९ वर्षाखालील युवा संघातील त्याची निवड जवळजवळ निश्चित होती. पण राजकारण आडवे आले. त्या वयोगटातही त्याला गुणवत्ता असूनही वगळण्यात आले. राजकारण आणि महंमद शामी यांची गट्‌टी जमली तेव्हापासूनच; जी आजही कायम आहे.
  त्याच्या प्रशिक्षकाने काय केले असेल; तर ते त्याला सरळ कोलकाता येथे घेऊन गेले. तेथे देवव्रत दास यांनी त्याला आपल्या छत्राखाली घेतले. बंगालच्या २२ वर्षाखालील संघातर्फे तो खेळायला लागला. त्याची पाटा खेळपट्‌टीवरही चेंडूच्या शिवणीवरून चेंडू दोन्ही बाजूला वळविण्याची कला पाहून २०१२ च्या भारतातील विंडिजविरुद्ध मालिकेत त्याला भारतीय संघांतर्फे खेळण्याची संधी मिळाली. वेग आणि स्वींग, लेट स्वींग या कलेमुळे त्याने राष्ट्रीय निवड समितीवर आपली छाप पाडली. २०१३ साली त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१५ च्या ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेत त्याने २७ बळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली.

  तेथूनच त्याच्या जीवनाच्या संघर्षाचा खरा प्रवास सुरू झाला. दुखापतींमुळे संघांच्या आत-बाहेर होत राहीला. त्याचवेळी त्याच्या आयुष्यातील दुसरा संघर्षही सुरू झाला. पत्नीने त्याचे पाकिस्तानी मॉडेल्सबरोबरच्या संबधांची बोंब मारली. त्यानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल करणे, प्रसिद्धि माध्यमांना त्यांच्याविरुद्ध खाद्य पुरवणे, आदी प्रकार सुरू झाले.
  तिसरीकडे समाजकंटकही, सामाजिक बुरख्याआडून घरावर दगडफेक करणे, निषेध करणे, त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी करणे आदी गोष्टी करीतच होते. कुणाकुणाशी लढणार? मात्र त्या संघर्षात त्याच्यासोबत संघातील सहकारी होते. त्याला धीर देत होते. बीसीसीआयनेही त्याला माशी झटकावी तसा झटकला नाही. उलट फेअर ट्रायल घेऊन त्याला मुक्त केले. त्याच्या दुखापतींवरील उपचारांची जबाबदारी घेतली. त्याचे दुखापतींचे नियोजन व्यवस्थित व्हावे म्हणूनही काळजी घेतली.
  दुखापतीमधून तो बाहेर आल्यानंतर संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा यांनीही त्याच्यावर विश्वास दाखविला. विराट कोहली तर त्याच्या पाठीशी होताच. विराटने पत्रकार परिषदेतही या गोष्टी वारंवार स्पष्ट केल्या. एखाद्याच्या पाठीशी त्याच्या सामाजिक गोष्टींवरून, कौटुंबिक समस्यांवरून किती मागे लागावे यालाही मर्यादा आहेत. त्या मर्यादांचे भान ठेवा असा सज्जड दमही दिला.

  त्यामुळेच आज क्रिकेट मैदानावर दिसतोय तो महंमद शामी पुन्हा अवतरला. त्याने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली. त्याने गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली. घराच्या मागील बाजूला, लाईट लावून एकट्यानेच, तासन् तास, चेंडूच्या शिवणीवरून चेंडू स्वींग करण्याचा सराव केला. तो भारतीय संघांसोबत नव्हता तेव्हाही स्वस्थ बसला नव्हता. आपल्या प्रशिक्षकांसोबत सराव करीतच होता. विश्वचषकात अवघ्या सहा सामन्यात त्याने मिळविलेले २३ बळी हे त्याच मेहनतीचे फळ आहे. त्याने आपली शक्ती वाचवून कशी गोलंदाजी करावी हे शिकून घेतले. चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी टप्पा अचूक ठेवण्यावर भर दिला. चेंडूची शिवण सरळ, टप्पा पडेपर्यंत असावी हे तंत्र घोटून घेतले. बॅक स्पीनची कला अधिक कसदार केली. एकाच टप्प्यावरून चेंडू दोन्हीकडे स्वींग करण्याची कला त्याला प्रसन्न झाली आहे. फक्त बोटांचा वापर करून आज तो प्रभावीपणे दोन्ही बाजूला चेंडू स्वींग करू शकतो.
  उजव्या आणि डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना तो एकाच टप्प्यावर चेंडू टाकून फक्त आत-बाहेर काढतो. टप्पा चुकत नाही. चेंडूच्या वेगात बदल करण्याच्या फंदात तो पडला नाही. त्याऐवजी चेंडू शिवणीवर सरळ कसा अचूक टप्प्यावर पडेल यावरच लक्ष केंद्रित केले. त्याचाच लाभ झालेला आज आपण पाहतोय. त्याला अजून खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे. फिटनेस हे त्याच्यापुढचे मोठे आव्हान असणार आहे. अन्य देशांमध्ये दौऱ्यावर असताना वेगवेगळ्या खेळपट्‌ट्या, हवामान असेल. त्यावेळीही त्याची कसोटी लागणार आहे. मात्र वानखेडे स्टेडियमच्या पाटा खेळपट्‌टीवर, ज्यावर सव्वासातशे धावा फटकाविल्या गेल्या, त्या खेळपट्‌टीवर त्याने सात बळी घेतले. फलंदाजांच्या या खेळात उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविला. एक दिवसीय क्रिकेटमध्ये पाचपेक्षा अधिक बळी चारवेळा घेणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे. महंमद शामीच्या गोलंदाजीच्या यशाचा आलेख भारतीय संघांच्या यशाची कमानही उंचावणारा असेल.

  – विनायक दळवी