राऊतांच्या मुख्यमंत्र्यांवरील ‘त्या’ आरोपांवरुन शिंदे गट आक्रमक; संजय शिरसाट यांनी सुनावले खडेबोल

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  पुणे : लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मतदानापूर्वी सत्ताधारी नेत्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात होता. पुण्यामध्ये देखील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पैसे वाटप आरोप रवींद्र धगेंकर यांनी केला. त्याचबरोबर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशाच्या बॅगा आणल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ शेअर करत आरोप केले होते. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला असून संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  संजय राऊत यांचा आरोप? 

  संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्याचे व्हिडीओ तुम्हाला पाहायचे आहेत का?

  याबाबत प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांनी एवढा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत, तर त्यांनी पोलिसांत तक्रार का नाही दाखल केली असा प्रतिप्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर टीका करून एक चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. पैशांच्या बॅगा अशापद्धतीने नेल्या जात नाहीत. आम्ही देखील मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्या पण त्या अशा उघडपणे नाही पोहोचवल्या. मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्याचे व्हिडीओ तुम्हाला पाहायचे आहेत का? कुठल्या टेम्पोतून किंवा कुठल्या गाडीतून पैसे आले? हे सर्वांना माहीत आहे, याचे उत्तर कसे देणार? असा सवाल उपस्थित करत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर ऩिशाणा साधला.

  मुर्खांच्या डोक्यावर परिणाम झालेला

  पुढे संजय शिरसाट म्हणाले, विरोधकांकडून कधी ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा आरोप केला जात आहे, तर कधी याप्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. कोणताही मूर्ख माणूस अशा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? मुर्खांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामुळे ते बडबड करत आहेत, त्यामुळे त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही, असाही आरोप संजय शिरसाट यांनी केला.