नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला की नाही, नेमका कुणाचा दावा ठरतोय खरा ? काय आहे प्रकरण ?

आज राज्यातील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली. परीक्षेदरम्यान एका प्रश्नसंचाचे सील नागपुरातील एका सेंटरवर नियमबाह्य पद्धतीने फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला.

    नागपूर: संपूर्ण महाराष्ट्रात आज राज्यसेवा पूर्वपरीक्षा पार पडली. परंतु, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) कार्यकर्त्यांचा दावा आहे की, परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्यापूर्वीच प्रश्नसंचाचे सील फोडले. त्यांनतर, अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. त्यांनी परीक्षा केंद्रावरील स्टाफला या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी  उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर अभाविपनं संपूर्ण घटनेची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी (Collector of Nagpur) तसेच पोलीस आयुक्तांना दिली.

    आज राज्यातील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली. यात राज्यात एकूण २ लाख २२ हजार ३९५ विद्यार्थी परीक्षा देणार होते. ३९० पदांसाठी ही परीक्षा २०२१ च्या जाहिरातीनुसार होत आहे. परीक्षेदरम्यान एका प्रश्नसंचाचे सील नागपुरातील एका सेंटरवर नियमबाह्य पद्धतीने फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला. परीक्षा केंद्रावर पेपर आणल्या गेले त्यावेळीच पेपरचे सील फुटले होते. सील पेपर फोडण्यापूर्वी पेपर सील आहेत याचा दाखल म्हणून विद्यार्थ्यांची सही घेऊन नंतर सील फोडले जाते. परंतु, असे काहीच झाले नाही असा आरोप  विद्यार्थ्यांनी केला आहे.  सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याने  अभाविप कार्यकर्त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर आंदोलन सुरू केले आहे.

    परंतु, राज्य लोकसेवा आयोगाच्या ट्विटर अकाउंट वरून याबतीत एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे, ”आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.”  याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने आपली बाजू मांडणारे ट्विट करत असे काहीही घडले नसल्याचा दावा केला आहे. तरीसुद्धा या प्रकाराची दखल घेत कारवाई करावी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहे.