महावितरणकडे ७१ हजार कोटी रुपयांची थकबाकी, कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; उर्जामंत्री नितीन राऊतांचा इशारा

महावितरणकडे ७१ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे यानंतर कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. 

    औरंगाबाद : महावितरणकडे ७१ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे यानंतर कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

    दरम्यान याव्यतिरिक्त ते म्हणाले, महावितरण कंपनी स्वतः वीज विकत घेऊन नागरिकांना वीज पुरवठा करत असते. त्यामुळे विजेचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला पैसे भरावेच लागतील. कोणालाही फुकट वीज मिळू शकत नाही.

    औरंगाबाद महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात आयोजित बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, आमदार उदयसिंग राजपूत, औरंगाबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. गंगापूर, कन्नड, वैजापूर येथील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा काही दिवसांपूर्वी खंडित करण्यात आला होता. याबाबत बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी सवाल उपस्थित केले.

    त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून चालू बिल माफ करून घेण्यासंबंधी देखील मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीवर ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले, कंपनी चालवायची असेल तर किमान चालू दोन वीज दिले भरावीच लागतील. त्याचप्रमाणे मोठी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना हफ्त्याची सवलत दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणी वाकलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा, झुकलेले रोहित्र, उघडे पडलेले डीपी बॉक्स आहेत अशा ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना नितीन राऊत यांनी संबंधितांना दिलेल्या आहेत.