एसटी महामंडळाचा आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विलीनीकरण नव्हे तर अंशत: खासगीकरणाचा प्रयत्न;हैदराबादच्या कंपनीसोबत इलेक्ट्रीक बसबाबतचा करार

एसटी महामंडळाने हैदराबाद (Hyderabad) येथील कंपनीला ९ नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रीक बस(Electric Bus) भाडेतत्वाने चालविण्याबाबत ‘वर्क ऑर्डर’(Electric Bus Work Order) दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : एसटी महामंडळासमोर(MSRTC) असलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विलीनीकरण नव्हे तर अंशत: खासगीकरणाचा(Privatization Of MSRTC) प्रयत्न केला जात असल्याच्या दाव्याचा वारंवार इन्कार केला जात असला तरी महामंडळाने हैदराबाद(Hyderabad) येथील कंपनीला ९ नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रीक बस भाडेतत्वाने चालविण्याबाबत ‘वर्क ऑर्डर’(Electric Bus Work Order) दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा ठप्प असतानाच आणि महामंडळाच्या मालकीची ‘शिवाई’ विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आल्याने खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    विद्युत बस प्रवाशांसह महामंडळाला फायदेशीर
    सूत्रांच्या माहितीनुसार खासगी कंपनीच्या या बस आणि चालक शिवशाही प्रमाणेच खाजगी असतील तर महामंडळाचा वाहक असेल. या तत्त्वावर विद्युत बस महामंडळात दाखल होणार आहेत. या विद्युत बससाठी महामंडळ प्रति किलो मीटरसाठी ५७ रुपये मोजले जाणार असून बारा वर्षांसाठी या बस भाडेतत्वाचा करार केला जाणार आहे. या बसवर एसटी महामंडळाचे बोधचिन्हही असणार आहे. कंत्राटी शिवशाहीच्या बसला महामंडळाकडून इंधन पुरविण्यात येत होते. तसेच विद्युत बससाठी मात्र चार्जिंग स्टेशन आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असणार आहे. यामुळे ही विद्युत बस प्रवाशांसह महामंडळाच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरणार आहे, असा दावा महामंडळाचा आहे.

    ३ महिन्यांत १०० विद्युत बस
    यासाठी हैदराबादच्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एसटी महामंडळाकडून वर्कऑर्डर मिळाली असून त्यानुसार काम सुरू केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. येत्या ३ महिन्यांत पहिली आणि डिसेंबर २०२२अखेर सर्व १०० विद्युत बस टप्याटप्याने महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती या सूत्रांनी दिली. खासगी विद्युत बस १२ मीटर लांब वातानुकूलित इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशनची ३३ आसने + व्हीलचेयर + चालक अशी आहे. सुरक्षिततेसाठी त्यात सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेअर, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा आहेत असे या सूत्रांनी सांगितले.