
चेंबूरमध्ये असणाऱ्या माहूलगाव परिसरात एचपीसीएलच्या प्लांटमधून रासायनिक पावडरची मोठ्याप्रमाणावर गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. प्लांटमधून रासायनिक पावडरची गळती प्रचंड वेगाने सुरु होती. त्यामुळे माहूलगाव परिसरात रासायनिक पावडरचा अक्षरश: पाऊस पडत होता. परिणामी या भागात उभ्या असणाऱ्या गाड्यांवर आणि रस्त्यांवर पावडर पसरल्याचे चित्र दिसत होते. काहीवेळातच ही गळती रोखण्यात यश आले. मात्र, या प्रकारामुळे माहूलवासियांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे(Mumbai: Chemical rain in Chembur; Citizens are shocked to see the chemical powder layer).
मुंबई: चेंबूरमध्ये असणाऱ्या माहूलगाव परिसरात एचपीसीएलच्या प्लांटमधून रासायनिक पावडरची मोठ्याप्रमाणावर गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. प्लांटमधून रासायनिक पावडरची गळती प्रचंड वेगाने सुरु होती. त्यामुळे माहूलगाव परिसरात रासायनिक पावडरचा अक्षरश: पाऊस पडत होता. परिणामी या भागात उभ्या असणाऱ्या गाड्यांवर आणि रस्त्यांवर पावडर पसरल्याचे चित्र दिसत होते. काहीवेळातच ही गळती रोखण्यात यश आले. मात्र, या प्रकारामुळे माहूलवासियांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे(Mumbai: ; Citizens are shocked to see the chemical powder layer).
या प्रकारानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, अग्निशमन दल आणि आरसीएफ पोलीसांचे पथक माहूल गावात दाखल झाले होते. त्यांनी या प्रकाराची चौकशी करुन एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर पुढे काय कारवाई झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा एकूणच प्रकार चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन याविरोधात काही पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.
दत्तजंयतीच्या निमित्ताने माहूलगावात शनिवारी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांना प्रसाद म्हणून जेवण दिले जात होते. तेव्हाच एचपीसीएलच्या प्लांटमधून गळती सुरु झाली. त्यामुळे रासायनिक पावडर नागरिकांच्या जेवणात मिसळली गेल्याची शंका आहे. अद्याप यामुळे कोणालाही त्रास झाल्याचे वृत्त नाही. परंतु, इतक्या मोठ्याप्रमाणात पावडरचा वर्षाव झाल्याने नागरिकांना अजूनही दुष्परिणाम होण्याची भीती वाटत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी एचपीसीएल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एचपीसीएलच्या प्लांटमधून कॅटलिस्ट पावडरची गळती झाली होती. मात्र, ही पावडर बिनविषारी असल्याचा दावा एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना काही त्रास जाणवल्यास त्याची जबाबदारी कंपनीची असेल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करु, असे आश्वासनही एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.